जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यासह शहरात करोना संक्रमणामुळे दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत लक्षणिय वाढ होवू लागली आहे.

करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जळगाव शहरात जनता कर्फ्यू लागू करुन जळगावकरांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याला शुक्रवारी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात पुर्णपणे बंद दिसून आले. गजबजलेल्या बाजारपेठेत आणि वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर आज सन्नाटा दिसून आला.

कोरोना नियंत्रणासाठी स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे. या जनता कर्फ्यूला शहरातील सर्वच व्यावसायिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. शहरातील फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गांधी मार्केट, आंबेडकर मार्केट, बी.जे.मार्केट असे शहरातील सर्वच मार्केट कळकळीत बंद दिसून आले.

अत्यावश्यक सेवा सुरु

शहरातील खासगी हॉस्पिटल, पेट्रोल पंप, दूध केंद्रांना सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. पेट्रोल पंपावर आवश्यकतेनुसारच पेट्रोल दिले जात होते. तसेच रिक्षाही अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच रस्त्यावर धावतांना दिसून आल्या.

दाणाबाजारासह किराणा दुकान बंद

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून, दाणा बाजारासह किराणा दुकान सुरु ठेवण्याची मुभा होेती. मात्र जिल्हाधिकार्यांनी जाहीर केलेल्या या तीन दिवसांच्या जनता कर्फ्यूमध्ये दाणाबाजारासह किराणा दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठांसह कॉलन्यांमधीलही किराणा दुकाने बंद असल्याचे चित्र

दिसून आले.

दुपारनंतर पोलीस बंदोबस्त गायब

जनता कर्फ्यूमुळे बाहेर फिरणार्यांवर कारवाईसाठी शहरातील आकाशवाणी चौक, काव्य रत्नावली चौक, स्वातंत्र्य चौक, नेहरु चौक, टॉवर चौक, अजिंठा चौफूली, पांडे डेअरी चौक, कोर्ट चौक, ख्वाजामियाँ चौक, कालिंकामाता चौक, अशा सर्वच चौकांमध्ये सकाळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बाहेर निघणार्यांची संख्या अल्प असलीतरी अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडणार्यांना थांबवून त्यांची चौकशी केली जात होती. चौकाचौकांमध्ये सकाळी आणि सायंकाळी बंदोबस्त होता. मात्र दुपारी दिसून आला नाही.

उपायुक्त वाहुळेेंनी रोखले डंपर

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमिवर मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग अधिकार्यांसह सहा पथक नेमले होते. जनता कर्फ्यूत नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचार्यांसह पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यानुसार उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह मनपाचे पथक सुभाष चौकात पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, सुभाष चौकातून जातांना डंपर दिसून आले. त्यामुळे उपायुक्त वाहुळे यांनी त्यांना थांबवून शहरातून जाण्यास मज्जाव केला.

विनाकारण फिरणार्यांना तंबी

शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून, विनाकारण फिरणार्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. सकाळपासून काही ठिकाणी विनामास्क फिरणारे आढळून आले. तर काही टारगट मुले मोटरसायकलवर ट्रीपलसीट दिसून आल्याने पोलिसांनी त्यांना थांबवत तंबी दिल्याचे चित्र काही चौकांमध्ये निदर्शनास आले. तसेच महानगरपालिकेच्या नियुक्ती केलेल्या पथकांनीदेखील शहरातील विविध परिसरात जावून दुकान सुरु आहे की नाही, याची टेहळणी केली. दरम्यान, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.