जिल्ह्यातील जीर्णावस्थेतील 21 अंगणवाड्या कात टाकणार

इमारत निर्लेखनासाठीच्या प्रस्तावाला प्रशासनाची मान्यता
जिल्ह्यातील जीर्णावस्थेतील 21 अंगणवाड्या कात टाकणार
Jalgaon ZP

लालचंद अहिरे - Jalgaon - जळगाव :

जिल्हा परिषदे अंतर्गत जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अंगणवाड्या भरविल्या जात होत्या. मात्र, त्या अंगणवाडीच्या 21 इमारती जुन्या होऊन मोडकळीस आलेल्या आहेत.

जिल्ह्यभरातून पडक्या व मोडकळी आलेल्या अंगणवाडी केंद्राची माहिती ग्रामस्तरावरुन मागविण्यात आलेली होती. यात जिल्ह्यातील 21 अंगणवाडी केंद्राचा प्रस्ताव आलेला होता. त्यास सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली असून लवकरच अंगणवाडी इमारतींचे निर्लेखन करण्यात येईल. त्यानंतर नवीन अंगणवाडी केंद्र उभारण्यासाठी जि.प.बांधकाम विभागाकडून निविदा मागविण्यात येणार आहे.

आर.आर.तडवी,जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण

यासंदर्भात महिला व बालकल्याण समितीच्या सभेत चर्चा करण्यात येऊन त्यास सर्व सदस्यांसह सभापती ज्योती राकेश पाटील यांनी निर्लेखनाच्या मान्यतेसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

16 जुलै रोजी झालेल्या सभेत या 21 अंगणवाड्यांचे तालुकानिहाय निर्लेखनाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात 21 अंगणवाड्यांचे रुपडे पालटणार आहे. जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत जुन्या व पडकी अंगणवाडी केंद्र इमारतीचे निर्लेखनास मान्यता मिळण्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती राकेश पाटील यांच्यासमोर सभेत सुरुवातीला प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता.

या सभेत समितीच्या सर्व सदस्यांनी सर्वानुमते ठराव करुन जिल्ह्यातील 21 पडक्या अंगणवाडी केंद्र इमारतीच्या निर्लेखनास संमती दर्शविण्यात आली होती.

जिल्ह्याभरातून जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या अंगणवाड्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात धरणगाव तालुक्यातील चांदसर, तरडे येथील अंगणवाडी केंद्र, पाचारो तालुक्यातील साजगाव, सार्वे बु., नेरी, होळ, खाजोळा,भडाळी अंगणवाडी केंद्र, तर चोपडा तालुक्यातील कोळंबा, गोरगावले, सुटकार, वर्डी,वडी,वर्डी अंगणवाडी केंद्र, अमळनेर तालुक्यातील सुंदर पट्टी, राजोरे अंगणवाडी केंद्र,तर चाळीसगाव तालुक्यातील सेवानगर,डामरुण अंगणवाडी केंद्र मोडकळीस आलेल्या आहेत.

जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे अंगणवाडी केंद्र, तर रावेर तालुक्यातील दोधे,चोरवड अंगणवाडी केंद्र सध्या स्थितीत पडक्या अवस्थेत आहेत. या पडक्या अंगणवाडी केंद्राचा प्रस्ताव तालुकास्तरावरुन मागविण्यात येऊन त्यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आलेली होती.

7 तालुक्यांतील प्रस्ताव

जिल्ह्यातील पाचोरा व चोपडा तालुक्यातील 6 तर धरणगाव, अमळनेर, चाळीसगाव, रावेर तालुक्यातील प्रत्येकी 2 तर जामनेर तालुक्यात 1 अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. जिल्हाभरातून सात तालुक्यातूनच प्रस्ताव आलेले होते.

16 रोजी झालेल्या जि.प. सर्वसाधारण सभेत अंगणवाडी इमारतींचे निर्लेखनाचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता. सभागृहाने सर्वांनुमते या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने 21 अंगणवाड्यांचे भाग्य उजळणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com