जिल्ह्यातील 8 हजार प्राथमिक शिक्षक वेतनाविना
जळगाव

जिल्ह्यातील 8 हजार प्राथमिक शिक्षक वेतनाविना

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शासनाच्या नियमानुसार शिक्षकांचे एक तारखेला पगार झाले पाहिजे, असे निर्देश आहेत. ऑनलाइन कामे होऊनही शिक्षकांना दरमहिन्याला 10 तारखेनंतरच पगार होत आहेत. मात्र, जानेवारी महिन्याचा पगार फेब्रुवारी महिन्याचे तीन आठवडे उलटूनही जिल्ह्यातील आठ हजार शिक्षक पगारविनाच आहेत. वेळेवर पगार नसल्याने शिक्षक हवालदिल झाले आहेत. या महिन्यात शासकीय सुट्या आणि मनुष्यबळाची कमी संख्यामुळे शिक्षकांना फटका बसल्याची चर्चा आहे.

शासनाने सर्वत्र ऑनलाइन कामे करुन शासकीय प्रशासन गतीमान करण्यावर भर दिला आहे. आता ऑनलाइनची कामे वेगाने होत आहे. तरीही दरमहिन्याला शिक्षकांचे पगार 10 तारखेनंतर होत असल्याच्या तक्रारी आहे. काही शिक्षक संघटनांनी शिक्षकांना 1 तारखेलाच पगार मिळावा, यासाठी आंदोलन, उपोषण करुन प्रशासनाला निवेदनाव्दारे जागृत करण्याचे काम केले.

मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यातच या महिन्याचे पगार तीन आठवडे उलटूनही झाले नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. एकीकडे वेळेवर पगार होत नसल्याची ओरड आहे, तर दुसरीकडे संबंधित विभागाकडून जिल्हापरिषदेला उशिरा बिले सादर करण्यात येत असल्याने उशिर होत आहे, असा आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु आहे. दरम्यान, या संदर्भात लेखा व वित्त विभागाशी संपर्क साधला असता शिक्षकांचे पगार तालुकास्तरावर पाठविण्यात आले असल्याचे सांगितले.

जि.प.शिक्षकांचे पगाराचा अहवाल मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्याकडून बिओंकडे जातो. त्यानंतर बिओंकडून जिल्हापरिषद विभागाकडे जातो.जि.प.कडून ताहुकास्तरावर गटविकास अधिकार्‍यांकडे जातो. त्यानंतर संबंधित शाळेच्या शिक्षकांच्या खात्यात पगार जातो.त्यातच अजून शिक्षकांचे वेगवेगळ्या बँक खाते असल्याने अजूनच अडचणीत भर पडत असल्याचे बोलले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com