संशयास्पद । चांगदेवच्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयात नातेवाइकांचा ठिय्या
जळगाव

संशयास्पद । चांगदेवच्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयात नातेवाइकांचा ठिय्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव
काकाने दाखल केलेल्या हाणामारीच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्त झालेल्या सुनील भागवत तारू (वय 40, रा.चांगदेव, ता.मुक्ताईनगर) यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयासमोर पोलीस आणि कारागृह प्रशासनावर प्रचंड संताप व्यक्त केला. नातेवाईकांच्या मागणीनुसार रुग्णालयाच्या प्रशासनाने न्या.डी.बी.साठे यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन वैद्यकीय अधिकार्‍यांनी इन कॅमेरा शवविच्छेदन केले.

या तरुणास वारंटसंदर्भात शेतातून अटक करण्यात आली. त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांनी अटकेबाबत व नंतर त्यांची प्रकृती गंभीर असताना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतरही नातेवाईकांना कळविले नाही. त्यांना निर्दोष मुक्ततेनंतर पोलीस जिल्हा रुग्णालयात बेवारस स्थितीत सोडून निघून गेले होते. या निष्काळजीपणाबाबत जो पर्यंत संंबंधित दोषी अधिकार्‍यांवर ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका तरुणाच्या नातेवाईकांनी सकाळी घेतली होती. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयातील नातेवाईकांच्या जमावांने जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको, ठिय्या आंदोलन केले. या संतप्त जमावास नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए.ए.पटेल यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे सहकारी व दंगा नियंत्रण पथकाने बंदोबस्त राखला.

वृद्ध आईस आली भोवळ
तरुणाच्या मृत्यमुळे त्यांची आई गुंफाबाई तारू, पत्नी मंगलाबाई तारू, 13 वर्षीय मुलगी मोनाली, 11 वर्षीय मुलगी भावना, आठ वर्षीय मुलगा यश, बहीण सुनीता दिलीप कोळी (तासखेडा), नीता जितेंद्र तायडे (उधळी, ता.रावेर) यांच्यासह इतरांनी आक्रोश केला. एकुलता एक मुलगा अचानक गमवावा लागल्याचे दु:ख आईने बोलून दाखवले. या घटनेमुळे वृद्ध आईस गर्दीत भोवळही आली.

Deshdoot
www.deshdoot.com