जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

नववर्षाच्या प्रारंभीच एसटी महामंडळाच्या जळगाव विभागासह जळगाव आगाराच्या लालपरीने 30 रुपये पर किलोमीटरने उत्पन्न मिळवित 10 लाख 71 हजार किलोमीटर फिरत 6 लाख 73 हजार 398 प्रवाशांची वाहतूक करीत जवळपास 3 कोटी 19 लाख 7 हजार रुपये उत्पन्न मिळवून राज्यात नंबर वन असल्याची माहिती जळगाव आगाराचे प्रमुख प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

म्हणजे जळगाव विभागासह आगाराने नववर्षाच्या प्रारंभीच उत्पन्नाचे स्वरुपात मोठे गिफ्ट एसटी महामंडळाला दिले आहे.

यावेळी त्यांचे सोबत वाहतूक नियंत्रक मनोज तिवारी , शिरीष चौधरी आदी उपस्थित होते. उत्पन्नाबाबतचे श्रेय हे विभाग प्रमुख राजेंद्र देवरे यांचेसह शहर आगाराचे प्रमुख प्रज्ञेश बोरसे, सहप्रमुख निलेश पाटील व इतर आगारांचे प्रमुखांना जाते.

कोरोनाच्या काळात तब्बल साडेचार महिने लालपरीचे चाक जागेवरच स्थिरावले होते. त्यानंतरही किमान महिनाभर तरी लालपरीचे शेड्युल्ड विस्कळीतच राहिले. लालपरीला पूर्ववत व्हायला बराच कालावधी लागला एवढा फटका या कोरोनाच्या भीषण अशा महामारीचा लालपरीला बसला. या दरम्यान काही घटीत अघटित घटनांना जळगाव आगाराला सामोरे जावे लागले.

मालवाहतुकीतही नंबर वन

दरम्यान 28 मे पासून राज्यात एस टी मंहामंडळाने माल वाहतूक क्षेत्रात पाय टाकत आपल्या बसेसद्वारे मालवाहतूक सुरू केली. अवघ्या दीड महिन्यातच जळगाव आगाराने मालवाहतुकीत 1 नंबर मिळवला होता. त्या पाठोपाठ नववर्षाच्या प्रारंभीच अवघ्या 5 दिवसातच राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत पुन्हा नंबर 1 मिळवण्याची किमया साधली. मालवाहतुकीचे श्रेय हे या विभागाचे प्रमुख श्री. बंजारा, श्री. शिरसाठ, श्री. सुर्यवंशी यांचेसह जिल्ह्यातील इतर आगारातील मालवाहतूक प्रमुखांसह आगारप्रमुखांना आहे.

शेगाव बस दर शनिवारी

सध्या लग्नसराई व शेगाव, नांदुरा येथे मोठ्या प्रमाणावर जाणार्या प्रवाशांसाठी जळगाव आगाराने जळगाव ते शेगाव ही एक विशेष बस सुरू केली आहे.

शेगाव बस ही दुपारी 2 वाजता जळगाव आगारातून निघेल, सायं. 5 वा. नांदुरा येथे पोहचेल तेथे बालाजीचे दर्शनासाठी भाविक जात असतात.

तेथून ही बस 7 वा. शेगाव येथे पोहचेल व तेथेच मुक्कामी राहील व दुसर्या दिवशी सकाळी तेथून जळगाकडे प्रस्थान करेल, तरी प्रवाशी, नागरिकांनी या बससेवेसह सुरक्षित अशा लालपरीच्या इतर सेवांचा लाभ घेण्याचे आवाहनही आगारप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांनी केले.

एका दिवसाचे उच्चांकी उत्पन्न

सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने तसेच प्रवाशांची अधिक गर्दी लक्षात घेता तेथे लालपरीची फेरी वाढविण्याच्या धोरणामुळे याचा फायदाही जळगाव आगारान घेत 5 जानेवारी रोजी तर 19 हजार किलोमीटर प्रवास करीत तब्बल 72 लाख 21 हजार उत्पन्न एकाच दिवसात मिळविले.

तसेच गेल्या तीन आठवडे ते 15 दिवसापासून विभागातून व जळगाव आगारातून सर्वच फेर्या सुरू झाल्याने लालपरी आता जिल्ह्यात पूर्वपदावर आली आहे.

माल वाहतुकीसह आता प्रवाशी वाहतुकीतही जळगाव विभागासह शहर आगाराने दुसर्यांदा राज्यातून उत्तम कामगिरी केली आहे.