खादी ग्रामोद्योगाची जागा शासन जमा
जळगाव

खादी ग्रामोद्योगाची जागा शासन जमा

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जिल्हा परिषद कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या टॉवर चौकातील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या जागेत महसूल विभागाने खादी ग्रामोद्योगच्या जागेस सील लावत जप्तीची कारवाई केली. महसूल विभागाची रितसर परवानगी न घेता खादी ग्रामोद्योग विभागाकडून हॉटेल पकवान यांचेसह परस्पर अन्य व्यावसायीकांना भाडेतत्वावर देण्यात आली असल्याने या ठिकाणी शर्तभंग झाला असल्याच्या कारणावरून जळगाव तहसील विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, नगर भूमापन अर्थात सीटीसर्व्हे विभाग आदींकडून पोलिस बंदोबस्तात खादी ग्रामोद्योग भवन इमारतीला सील लावण्याची कारवाई करण्यात आली.

शहरातील अत्यंत महत्चाच्या ठिकाणी टॉवर चौक परिसरात खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या मालकिची जागा आहे. शहरातील टॉवर चौकातील खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या मालकीच्या व हॉटेल पकवानसह अन्य व्यावसायिकांना नियम धाब्यावर बसवून कराराने दिलेल्या जागा आज पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेण्यात आल्या. शहरातल्या टॉवर चौकात खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या मालकीची जागा असून तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सर्व सेवा समितीला अटी-शर्तीं आधारे भाडे करार तत्वावर देण्यात आली होती.

जिल्हा सर्व सेवा समिती संस्थेने सर्व नियम धाब्यावर बसवून अन्य काही व्यावसायिकांना तेथील जागा भाड्याने देण्यात आल्या होत्या. यात हॉटेल पकवानसह अन्य व्यावसायिकांसह अन्य व्यापारी आस्थापनांचा समावेश होता. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पाठपुरावा केला होता. यासदर्भात संबंधित जागा खादी ग्रामोद्योग महामंडळाला परत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दि.27 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हा सर्व समितीकडून या सर्व जागा ताब्यात घेण्याचे आदेश पारीत केले होते.

त्यानुसार दि.6 मार्च रोजी महसूल प्रशासन, सीटीसर्व्हे, व पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने पोलीस बंदोबस्तामध्ये हॉटेल पकवानच्या परिसराची जागा सिलबंद करण्याची कारवाई करीत ताबा घेतला आहे. हॉटेल पकवानसह अन्य व्यावसायिकांच्या जागांनाही सील लावण्यात आले आहे. यावेळी जळगाव मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी रमेश वंजारी, सीटीसर्व्हेचे ए.यु.कदम, पोलिस प्रशासन कर्मचारी आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com