वॉररुमच्या नावाखाली रुग्णांसह नागरिकांची थट्टा

मनपाने दिलेला टोल फ्रि क्रमांक १८००२३३८५१० नो-रिप्लाय
वॉररुमच्या नावाखाली रुग्णांसह नागरिकांची थट्टा
Jalgaon Municipal Corporation

जळगाव - Jalgaon :

करोनाची दुसरी लाट अधिक तीव्र असल्यामुळे बाधितांच्या संख्येत लक्षणिय वाढ होवू लागली आहे. रेमडेसीवीर, ऑक्सिजन, बेडचा आधिच तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

रुग्णांसह नातेवाईकांना बेडसह अन्य माहिती उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिकेने वॉररुम सुरु करुन त्यात टोल फ्रि क्रमांक १८००२३३८५१० दिला आहे.

याबाबतचे पत्रक मनपाचे उपायुक्त शाम गोसावी यांनी माध्यमांना प्रसिध्दीसाठी दिले आहे. याबाबतची खातरजमा करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’ ने दिलेल्या टोल फ्रि क्रमांकामवर तब्बल दोन तास संपर्क साधला असता, नो-रिप्लाय आला आहे.

त्यामुळे मनपाने वॉररुमच्या नावावर रुग्णांसह नागरिकांची एकप्रकारे थट्टा केली की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांना एकाच ठिकाणी संपुर्ण माहिती उपलब्ध होईल या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्रपणे वॉररुम सुरु केली आहे.

त्याच धर्तीवर महानगरपालिकेने आठव्या मजल्यावरील आरोग्य विभागात वॉररुम कार्यान्वित केली असल्याचे मनपा उपायुक्त शाम गोसावी यांनी कळविले आहे.

महापालिकेच्या क्षेत्रात सुरु केलेले कोविड केअर सेंटरमधील बेड उपलब्धतेविषयी व कोरोना विषयक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच होम क्वारंटाईनमध्ये असलेले रुग्ण बाहेर फिरत असतील तर त्यांच्या बाबतीत तक्रार करण्यासाठी २४ तास वॉररुम सुरु करण्यात आली असून, त्यासाठी १८००२३३८५१० हा टोल फ्रि क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे. मात्र या क्रमांकावर संपर्क साधला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

‘देशदूत’ने केली खातरजमा

जळगाव शहरातील कोरोना बाधित रुग्णांना कोविड केअर सेेंटरमध्ये बेड उपलब्धतेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी मनपाने दिलेल्या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधून खातरजमा करण्याचा प्रयत्न केला.

मात्र टोल फ्रि क्रमांकावर केवळ रिंग जात असून, तिकडून सॉरी, नो-रिप्लाय असा संदेश प्राप्त होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर अनेक प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com