बड्या 13 थकबाकीदार गाळेधारकांचे बँक खाते सील

मनपा प्रशासनाची कारवाई; टप्प्या-टप्प्याने ओढवणार गाळेधारकांवर नामुष्की
बड्या 13 थकबाकीदार गाळेधारकांचे बँक खाते सील
Jalgaon Municipal Corporation

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना थकीत रक्कम भरणाबाबत वारंवार नोटीस बजावण्यात येत आहे. मात्र अद्यापही काही बड्या थकबाकीदार गाळेधारकांनी थकीत रक्कम न भरल्यामुळे 13 गाळेधारकांचे वेगवेगळ्या बँकेतील खाते सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, टप्प्या-टप्प्याने बँक खाते सील करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे समजते.

मनपा मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्ठात आली आहे. तेव्हापासून गाळेधारकांकडे थकीत रक्कम आहे. मनपा प्रशासनाने थकीत रक्कम न भरल्यास गाळे सील करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार महात्मा गांधी मार्केटमधील एका गाळ्यावर सीलची कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईला विरोध करत, गाळेधारकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे गाळे सील न करता, गाळेधारकांचे बँक खाते सील करण्याचा मनपा प्रशासनाने निर्णय घेतला असून, 13 बड्या थकबाकीदारांचे बँक खाते सील करण्यात आले आहे.

अवाजवी बिलांबाबत आरोप

18 व्यापारी संकुलांपैकी चार व्यापारी संकुल व्यावसायिक तर 16 व्यापारी संकुल अव्यावसायिक अशी वर्गवारी करण्यात आली आहे. या संदर्भात महासभेत ठरावदेखील झालेला आहे. दरम्यान, प्रशासनाने दिलेली बीले अवाजवी असल्याचा आरोप 16 अव्यावसायिक संकुलातील गाळेधारकांनी केला आहे.

त्यानुसार मागील महिन्यात तब्बल 15 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. परंतू, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आणि कडक निर्बंध लागू केल्यामुळे गाळेधारकांचे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

नूतनीकरणाच्या ठरावालाही विरोध

महानगरपालिकेत अडीच वर्षानंतर सत्तांतर होवून शिवसेनेने सत्ता हाती घेतली. ज्या गाळेधारकांनी थकीत रक्कमेचा भरणा केला आहे. अशा गाळेधारकांना गाळे नूतनीकरण करुन देणे तर ज्या गाळेधारकांनी अद्यापही थकबाकीचा भरणा केलेला नाही. अशा गाळेधारकांचे गाळे ताब्यात घेवून लिलाव करण्याचा प्रशासनाचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. परंतू, या ठरावालाही गाळेधारकांनी विरोध केला आहे.

गाळेधारकांमध्ये खळबळ

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील भाडेपोटी थकबाकी न भरल्याने बँक खाते सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार 13 बड्या थकबाकीदार गाळेधारकांचे बँक खाते सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गाळेधारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आधीच कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे थकबाकी भरण्यासाठी आलेले संकट या दोन्ही संकटांमुळे गाळेधारक पुरते कोंडीत सापडले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com