जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महास्वच्छता अभियानांतर्गत पहिल्या दिवशी सोमवारी शिवाजी नगरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभियानास सुरुवात करण्यात आली.

प्रभागात पाहणी करताना अस्वच्छतेसह नागरिकांनी अमृत योजना व भूमीगत गटारींमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून चार्या योग्यप्रकारे बुजविण्यात येत नसल्याची नागरिकांनी तक्रार केली. दरम्यान, अभियानाच्या पहिल्या दिवशी 308 टन कचरा संकलीत करण्यात आला.

याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, मनोज आहुजा, कांचन सोनवणे, सरिता नेरकर, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, प्रवीण कोल्हे, मंगेश जोहरे, भरत सपकाळे, उत्तम शिंदे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले आदींसह मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दिवसभरात उचलला 308 टन कचरा

सोमवारी 875 पैकी 740 कर्मचारी हजर तर 135 गैरहजर होते. त्यात 18 वैद्यकीय व अग्रीम रजेवर होते. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत शहरातून 308 टन कचरा संकलित करण्यात आला. एरव्ही दर दिवसाला सरासरी 270 टन कचरा संकलन केला जातो. प्रभाग 1 ते 6 मधून तब्बल 38 टन अतिरिक्त कचरा संकलन करण्यात आले. स्वच्छता मोहीममुळे इतर प्रभागात अडचण होऊ नये यासाठी प्रत्येक प्रभागात काही कामगार ठेवण्यात आले होते.

एलईडीच्या कामाला सुरुवात करा

शिवाजीनगर परिसरात जवळपास 750 खांब असून त्यावर एलईडी बसविण्यात आले नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी लागलीच विद्युत विभागाला सूचना देत काम सुरू करण्याचे सांगितले. गुरुवारपासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येऊन 2 दिवसात काम पूर्ण होईल अशी माहिती अधिकार्यांनी दिली. तसेच हरिओम नगरात देखील एलईडी बसविले नसल्याची तक्रार नगरसेवकांनी मांडली असता महापौरांनी सूचना दिल्या.

गटारींची स्वच्छता होत नाही

शिवाजी नगर, भारत नगर, हरिओम नगर, प्रजापत नगरात गटारींची स्वच्छता नियमीत होत नाही. गटारीतून काढलेली घाण 2 दिवस उचलण्यात येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. नगरसेवकांच्या घरासमोर कर्मचारी दररोज सफाई करून निघून जात असल्याची माहिती नगरसेवक आणि नागरिकांनी दिली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी लागलीच मनपा अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांची कानउघडणी करत दररोज साफसफाई करण्याच्या सूचना केल्या. कोणत्या प्रभागात मनुष्यबळ कमी असल्यास ते वाढवावे असेही त्या म्हणाल्या.

डागडुजीसाठी मनुष्यबळ वाढविणार

जळगाव शहरात अमृत योजना आणि भूमीगत गटारींच्या कामासाठी खोदलेल्या चार्या योग्य पद्धतीने बुजविण्यात आलेल्या नसून खडी बाहेर येत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. अमृतच्या नळ संयोजनची जोडणी झालेली असो किंवा नसो चार्या दुरुस्ती तात्काळ करावी. चार्या योग्य पध्दतीने रस्त्यांच्या समांतर करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या. तसेच प्रजापत नगरातील कुंभार वाड्याचा मुख्य रस्ता डांबरीकरण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही त्यांनी सांगितले.