ठरावाच्या निर्णयासाठी जळगाव मनपाच्या नगरसेवकांची धाकधूक

मनपाची उद्या महासभा; वॉटरग्रेस लवाद, गाळ्यांच्या निर्णयाकडे लक्ष
ठरावाच्या निर्णयासाठी जळगाव मनपाच्या नगरसेवकांची धाकधूक
jalgaon municipal corporation

जळगाव - Jalgaoan :

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांसह साफसफाई मक्तेदार वॉटरग्रेससाठी लवाद नियुक्तीच्या निर्णयासह ७७ विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्या दि. १२ रोजी सकाळी ११.३० वाजता महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होणार आहे.

गाळ्यांचा आणि वॉटरग्रेस लवाद नियुक्तीचा ठराव अडचणीचा ठरत असल्याच्या भीतीपोटी अनेक नगरसेवकांची धाकधूक सुरु झाली आहे. त्यामुळे बुधवारी होणार्‍या महासभेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या २० व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महासभेत प्रस्तावित करण्यात आला आहे.

मात्र, या ठरावाला जळगाव शहर मनपा गाळेधारक संघटनेने विरोध केला आहे. ज्या गाळेधारकांनी थकबाकीचा भरणा केलेला आहे.

अशा गाळेधारकांना नूतनीकरण करुन देण्याचा आणि ज्या गाळेधारकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही, अशा गाळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय महाभसेत घेतला जाणार आहे.

मात्र हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी केलेला आहे. तसेच शहरातील कचरा संकलन आणि साफसफाईसाठी मनपाने करार करुन वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षांसाठी मक्ता दिलेला आहे.

मनपा आणि मक्तेदार यांच्यात असलेल्या वादाबाबत लवाद नियुक्त करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला आहे. परंतू या प्रस्तावावर ऍड. विजय पाटील यांनी हरकत घेतली आहे.

सदरचा ठराव हा बेकायदेशिर असून नगरसेवकांनी हा ठराव मंजूर केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा ऍड. पाटील यांनी तीन दिवसांपुर्वी पत्रकार परिषदेत दिला आहे.

त्यामुळे महानगरपालिकेतील सत्ताधार्‍यांसह विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, उद्या दि. १२ रोजी होणार्‍या महासभेत काय निर्णय घेतला जाईल. याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com