पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा ठराव

जळगाव मनपाच्या महासभेत बहुमताने मंजूर
पाच नगरसेवकांच्या अपात्रतेचा ठराव

जळगाव - Jalgaon :

घरकुल घोटाळ्याप्रकरणी दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा भोगलेले विद्यमान नगरसेवक भगत बालाणी, कैलास सोनवणे, दत्तात्रय कोळी, सदाशिव ढेकळे आणि लताताई भोईटे या पाच नगरसेवकांना अपात्र करण्याच्या ठरावावर भाजपने विरोध केला.

दरम्यान, सत्ताधार्‍यांनी हा ठराव बहुमताने मंजूर केला. यावर आयुक्तांनी विधितज्ज्ञांकडून अभिप्राय घेतल्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचा खुलासा केला.

मनपाची ऑनलाइन महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीष कुलकर्णी, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते. यावेळी महासेभेच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली.

घरकुल घोटाळ्यातील शिक्षा लागलेल्या ५ नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतच्या प्रस्तावावर स्थायीचे सभापती राजेंद्र घुगे-पाटील म्हणाले की, हा प्रस्ताव न्यायप्रविष्ठ असून याबाबचा निर्णय प्रशासनाला नाही. या प्रस्तावावर प्रशांत नाईक आणि डॉ.अश्‍विन सोनवणे यांनी आपले म्हणणे मांडत आयुक्तांनी खुलासा सादर करण्याची मागणी केली.

त्यानंतर आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनाची भूमिका सादर करतांना म्हणाले की, या ठरावानंतर विधितज्ज्ञांकडून याची छाननी केली जाईल. त्यानंतरच या प्रस्तावावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तसेच अशासकीय प्रस्ताव महासभेत ठेवण्यापूर्वी प्रशासनाला याबाबत कल्पना द्यावी. जेणेकरुन यातील कायदेशीर बाजू मांडता येईल, अशी विनंतीही त्यांनी सभागृहात केली. त्यानंतर हा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यास भाजपाच्या सदस्यांनी विरोध नोंदविला.

सर्वपक्षीय समिती गठीत करुन धोरण ठरवावे

मनपा मालकीच्या जागेवर बीओटी तत्त्वावर स्वच्छतागृह बांधण्यास खासगी संस्थांच्या अर्जाबाबत धोरण ठरविण्याच्या प्रस्तावावर ऍड.शुचिता हाडा यांनी आक्षेप नोंदविला. त्या म्हणाल्या की, संस्थेच्या नावांची निवड कशाच्या आधारावर ठरविली याचा प्रशासनाने खुलासा करावा. तसेच यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करुन धोरण ठरवावे. जेणेकरुन जागा आणि संस्थेची निपक्षपणे निवड होईल. या समितीकडून चार दिवसात तपासणी करुन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत या प्रस्तावावर विरोध दर्शविला. स्वच्छतागृहांसाठी शहरातील २१ जागांची निवड करण्यात ८ जागांसाठी अनेक संस्थांकडून मागणी आहे. याबाबत नगरसेवक चेतन सनकत यांनीसुद्धा आपले मत मांडले.

पिंप्राळ्यात रुग्णालय बांधण्याच्या प्रस्तावाला ऍड. हाडा यांचा विरोध

पिंप्राळा येथे ओपन स्पेसवर मनपाचे रुग्णालय बांधण्याच्या प्रस्तावावर नागरिकांचा विरोध असल्याचे सांगत ऍड.शुचिता हाडा यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला. त्या म्हणाल्या की, कोणताही ओपन स्पेसवर बांधकाम न करण्याचे न्यायालयाचे निर्देश आहे. त्यावर प्रशासनातर्फे खुलासा सादर करण्यात येवून रुग्णालय बांधण्यासाठी येथील रहिवाशांकडून मत घेतले जाईल, असे सांगण्यात आले.

दरम्यान, वॉटरग्रेसच्या कामात सुधारणा करण्याची मागणी नगरसेविका ज्योती चव्हाण यांनी केली. तसेच वॉटरग्रेस आणि मनपा प्रशासनात लवाद नेमण्याच्या विषयावर अनेक नगरसेवकांचा संभ्रम निर्माण झाल्याचेही त्या म्हणाले.

उपस्थित सदस्यांचे मत नोंदविण्याची भाजपची मागणी

ऑनलाईन झालेल्या महासभेत सदस्यांना मत मांडू न देता अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच ऑनलाईन सभेत सुमारे ५० सदस्य उपस्थित असतांनासुद्धा सत्ताधार्यांनी बहुमताने प्रस्ताव मंजूर केले. त्यामुळे ऑनलाईन झालेल्या सभेत जे सदस्य ऑनलाईन उपस्थितीत असतील त्यांचेच मत विषयनिहाय नोंदविण्यात यावे. तसेच यापुढेही ऑनलाईन सभेत याप्रमाणेच कारवाई करावी, अशी मागणी स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी महापौरांना दिलेल्या पत्राद्वारे केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com