‘विकास’ हरवलाय !

सप्ताह घडामोडी : डॉ. गोपी सोरडे ,9834166072
‘विकास’ हरवलाय !
Jalgaon Municipal Corporation

जळगाव शहराच्या संदर्भात ‘विकास‘ कुठं हरवलाय ! अशीच म्हणण्याची वेळ जळगावकरांवर आली आहे. सत्ता कोणाचीही आली तरी सुरुवातीला विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारतात. मात्र प्रत्यक्ष त्यांच्या कृतीतून किंवा उक्तीतून कुठेही विकास दिसून येत नाही. त्यामुळेच ‘विकास’ हरवलाय का? त्याला कोणी शोधणार का? तो कधीतरी सापडेल काय? किंवा तो सापडणारच नाही. असे समजून शोधण्याचा प्रयत्न कोणी करणार का? आणि तो सापडलाच तर तो ‘विकास’च असेल का? असे काहीसे बरेचसे प्रश्न जळगावकरांसाठी अनुत्तरीतच आहेत.

जळगाव शहराचे साता समुद्रापार नाव लौकिक आहे. सुवर्णनगरी, चटई उद्योग, केळी, कापूस, व्यापारी संकुल, महानगरपालिकेची 17 मजली प्रशासकीय इमारत, अशा अन्य बाबींमुळे जळगाव शहर प्रचलित आहे.

हिंदी भाषेत जळगाव शहराला ‘जल’गाव असे म्हटले जाते. मात्र आता, शहरातील रस्त्यांची दयनिय अवस्था लक्षात घेता, ‘चिखलगाव’ म्हणून नावारुपाला येते की काय? असे म्हटलेतर नवल वाटायला नको. जळगाव शहरातील रस्त्यांची प्रमुख गंभीर समस्या आहे.

अमृत योजनेमुळे रस्त्यांची दुरावस्था झाल्याचा आरोप केला जात आहे. ही कामे गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहेत.

मात्र यापुर्वीचा विचार केला तर, शहरातील रस्ते सुस्थितीत होते का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता, अमृत योजना अर्थात शहरासाठी शाश्वत विकास ठरणार आहे. मात्र यास शाश्वत विकास असलेल्या अमृत योजनेवर खापर फोडले जात आहे.

मुळात विकासाच्या गप्पा मारणारे अनेकजण आहेत. त्याचप्रमाणे विकासाच्या नावावर जनतेची दिशाभूल करणारेही काही कमी नाही. त्यामुळेच ‘विकास’ हरवलाय असे म्हणणे संयुक्तीकच ठरणार आहे.

जळगाव महापालिकेचा विचार केला तर, अडीच वर्षातच बहुमतात असलेल्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लावला गेला आहे. हा सुरुंग दुसरा, तिसरा कोणी नव्हे तर, त्यांच्याच पक्षातील बंडखोर नगरसेवकांनी लावलाय.

त्यामुळे भाजप बंडखोर नगरसेवकांच्या पाठींब्यावर शिवसेनेच्या हातात सत्ता आली आहे. महापालिकेत सत्तांतर झाले असलेतरी, आश्वासनाचा ‘कित्ता’ सुरुच आहे. असे वाटले होते की, हरवलेला ‘विकास’ शिवसेना सत्ताधार्‍यांना सापडेल.

मात्र त्यांनीही ‘विकास’ला कधी शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत नाही. त्यामुळे जळगावकरांची अपेक्षा आहे. की, जळगावकरांच्या भल्यासाठी ‘विकास’ला शोधाच.!

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com