शहरातील 4800 खांब लाईटविनाच !

महापौरांनी ईईएसएलच्या अधिकार्‍यांना धरले धारेवर; कराराप्रमाणे एलईडी लाईट लावण्यासह देखभालीची जबाबदारी
शहरातील 4800 खांब लाईटविनाच !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गेल्या दोन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात शहरातील रस्त्यांवरील खांबांवर लावलेले पूर्वीचे सीएफएल लाईट काढून त्या जागेवर नवीन एलईडी लाईट लावण्याचे आदेश राज्यातील सर्व नगरपरिषदा, महापालिकांना देण्यात आले होते.

त्यानुसार शासनाच्या आदेशीत ईईएसएल या कंपनीकडून जळगाव शहरात एलईडी लाईट लावण्यात आले. त्या लावलेल्या लाईटची मेंटेनन्सची जबाबदारी ही करारनाम्यातील अटीनुसार सात वर्षांच्या करारावर कंपनीकडून लेखी स्वरूपात ठरली आहे.

मात्र शहरातील 4800 खांब लाईटविनाच असल्याचे निर्दशनास आल्याने महापौर जयश्री महाजन यांनी मक्तेदारांच्या प्रतिनिधींना धारेवर धरले.

महापौर सेवा कक्षसह नगरसेवकांकडूनही महापौर, उपमहापौरांकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. याची गंभीरतेने दखल घेऊन महापौर जयश्री महाजन यांनी गुरुवारी, महापौर दालनात बैठक घेतली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी व महापालिका विद्युत समिती सभापती पार्वताबाई भिल यांच्यासह महापालिकेच्या विद्युत विभागाचे अधिकारी, ईईएसएल, महावितरण व ईईएसएलने नियुक्त केलेले वेंडर उपस्थित होते.

महापौर जयश्री महाजन यांनी सर्वांकडून विजेसंदर्भातील सर्वच विषयांवर चर्चा केली. अधिकार्‍यांना धारेवर धरत शहरातील ज्या खांबांवर लाईट नाही तेथे तत्काळ एलईडी लाईट लावावेत. हे काम 30 जून पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे. अशी सूचना केली.

ईईएसएलचे अधिकारी प्रसाद गांगोळे, महावितरणच्या रत्ना पाटील व धीरज बारापात्रे, ईईएसएलचे वेंडर श्री. यादव, महापालिका विद्युत विभागप्रमुख एस.एस. पाटील, सहाय्यक अभियंता विलास पाटील, शिंपी, युवराज मेढे, कमलाकर राणे, राधाकृष्ण बोरोले, मिलिंद बेंडाळे यावेळी उपस्थित होते.

30 जूनपर्यंत सर्व खांबांवर लाईट लावण्यासाठी अल्टीमेटम

ईईएसएलने सर्वेक्षणाच्या आधारे शहरातील खांबांवर जवळपास 15 हजार 500 एलईडी लाईट लावल्याचे सांगून अलीकडच्या काळातही काही वाढीव वस्त्यांच्या ठिकाणच्या खांबांवरही एलईडी लाईट लावण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे आम्हाला आता काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र द्या, अशी मागणी केली.

त्यावर महापौर, उपमहापौर व आयुक्तांनी त्यांना धारेवर धरत अनेक खांबांवरील लाईट बंदावस्थेत आहेत, ते का बंद आहेत याची चौकशी करा आणि नव्याने लाईट लावा. काही ठिकाणचे लाईट दिवसा, तर काही ठिकाणी रात्री लाईट सुरू असतात. त्याचे कारण तुम्ही मेंटेनन्स काहीही केलेले नाही. त्यामुळे येत्या 30 जूनपर्यंत शहरासह स्लम एरियातील सर्व खांबांवर लाईट लागले पाहिजेत अशा महापौरांनी सूचना दिल्या.

16 हजार खांबांचे सर्वेक्षण

महापालिकेच्या विद्युत विभागप्रमुखांनीही शहरात लाईट लावण्यासंदर्भात 16 हजार खांबांचे सर्वेक्षण केले असून, जवळपास 4 हजार 800 खांबांवर एलईडी लाईट नाहीत. सद्यःस्थितीत एकूण 6 हजार 500 खांबांवर एलईडी लाईट बसविणे गरजेचे आहे.

यात स्लम एरियासह शहरातील वाढीव भागांत पथदिव्यांसंदर्भात काहीही नियोजन नसल्याचे सांगत महावितरणने सोयीनुसार ग्राहकांना वीज कनेक्शन दिल्यामुळे पथदिव्यांच्या खांबांच्या ठिकाणी शॉर्टसर्किटसारखे प्रकार घडतात. त्यासाठी मदत करावी, आम्ही आपणास सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com