ओ साहेब, पाठीवर मारा; पोटावर नको !

गाळेधारकांची महानगरपालिका प्रशासनाला आर्त हाक
ओ साहेब, पाठीवर मारा; पोटावर नको !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जळगाव मनपाच्या 16 अविकसित, अव्यवसायिक मार्केटच्या गाळ्यांचे थकीत भाडे व गाळेकरार नुतनीकरणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळतच चालला आहे.

इतिहासकालीन जिझिया करालाही लाजवेल असे लाखो - कोटी रुपयांचे भाडे व दंडाच्या रक्कमेची बिले जळगाव मनपाने गाळेधारकांना दिली आहेत. यासोबतच ई -लिलाव व मालमतेवर बोजा लावण्याचे जाचक धोरण गाळेधारकांना कुटुंबियांसह देशोधडीला लावणार आहे.

त्यामुळे गाळ्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा आणि न्याय मिळावा यासाठी गाळेघारकांनी दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. दुसर्‍या दिवशी ‘ओ साहेब ,पाठीवर मारा पण,पोटावर मारु नका’ अशी प्रशासनाला आर्त हाक देत आंदोलन केले.

मनपाच्या गाळ्यांमध्ये गाळेधारक दैनंदिन व्यवहार करून आपल व आपल्या कुटुंबीयांचे पालन-पोषण व इतर जबाबदार्‍या पार पाडत आहेत.अशा स्थितीत कायद्याच्या चौकटीचा गैरवापर करून गाळ्यांची जप्ती आणि लिलाव करण्याचा घाट घातला जात आहे.

त्यातच 13 सप्टेंबर 2019 रोजी गाळेकरार संदर्भातील शासकीय अध्यादेश पारित करण्यात आला. हा अध्यादेश अन्यायकारक असुन गाळेधारकांना उद्धवस्त करणारा आहे. या सर्व बाबींचा निषेध म्हणून जळगाव शहर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेच्या 16 मार्केट मधील गाळेधारकांनी बेमुदत साखळी उपोषण पुकारले आहे. त्याचा आज दुसरा दिवस होता.

दुसर्‍यादिवशी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात सकाळी 9 ते 1 वालेचा मार्केटचे दिनेश नाईक, संजय अमृतकर, रवी जाधवाणी, सुरेश कुकरेजा, हरीश थोरणी साखळी उपोषण ला बसले होते तसेच दुपारी 1 ते 6 वालेचा मार्केटचे संदीप छबडीया, प्रतीक करम चांदनी, नंदलाल बुधानी, वासुदेव गेही, हरीश शामनानी हे गाळेधारक उपोषणाला बसले होते.जळगाव शहर महानगरपालिका मार्केट गाळेधारक संघटनेतर्फे पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणा च्या दुसर्‍या दिवशी वालेचा मार्केटचे गाळेधारकांनी ओ साहेब, पाठीवर मारा, पोटावर नका असे स्टिकर आपल्या पाठीवर लावले होते.

आज अर्धनग्न आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुकारण्यात आलेल्या साखळी उपोषणात भास्कर मार्केटचे गाळेधारक दि.17 रोजी अर्धनग्न आंदोलन करणार आहेत. जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत 16 मार्केटमधील गाळेधारक टप्प्या ट्प्याने साळखी उपोषण करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींसह संघटनांचा उपोषणाला पाठिंबा

गाळेधारकांच्या साखळी उपोषणला दोन दिवसात विविध संघटना, संस्थांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे तसेच महानगरपालिका स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे -पाटील यांनी बेमुदत साखळी उपोषणा ठिकाणी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

मनसेचे जिल्हा सचिव अ‍ॅड.जमील देशपांडे व जनहित कक्ष महानगराध्यक्ष संदीप मांडोळे तसेच बहुजन मुक्ती मोर्चाचे सुमित्र अहिरे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हासचिव विजय सुरवाडे, बहुजन क्रांती मोर्चाचे राजेंद्र खरे, भारत मुक्ती मोर्चाचे देवानंद निकम, कॉनफिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशन चे प्रवीण पगारिया, संजय शहा, दिलीप गांधी, राम सूर्यवंशी, अश्विन सुरतवाला यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com