मालमत्ता कराचा भरणा 31 मे पर्यंत केल्यास 10 टक्के सूट

करोनाच्या पार्श्वभूमिवर ऑनलाईनसह धनादेशाव्दारे करता येणार भरणा
मालमत्ता कराचा भरणा 31 मे पर्यंत केल्यास 10 टक्के सूट
Jalgaon Municipal Corporation

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाच्या पार्श्वभूमिवर मागील वर्षी मालमत्ता कराचा भारणा करण्यासाठी केवळ ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

मात्र यंदा ऑनलाईनसह धनादेशाव्दारेदेखील कराचा भरणा करता येणार आहे. 31 मे पर्यंत भरणा केल्यास दहा टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहिती अप्पर आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिली.

आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात मालमत्ता कराचा भरणा करणार्‍यांना दहा टक्के सूट देण्यात येते.

परंतू, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, गर्दी टाळण्यासाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. 31 मे पर्यंत मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा किंवा धनादेशाव्दारे भरणा केल्यास दहा टक्के सूट देण्यात येणार आहे.

मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी यंदा प्रशासनातर्फे 80 कोटींचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षी धनादेशाव्दारे किेंवा प्रत्यक्ष भरणा करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे केवळ ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा होती.

मात्र वसुली कमी झाल्याने यंदा ऑनलाईनसह धनादेशाव्दारे भरणा करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईनसह धनादेशाव्दारे भरणा करावा. असे आवाहन करण्यात आले अहे.

धनादेश ड्रॉप बॉक्समध्ये टाका

मालमत्ता कराचा धनादेशाव्दारे भरणा करतांना मिळकत धारकांनी धनादेशाच्या मागील बाजूस प्रभाग क्रमांक, मालमत्ता क्रमांक, नाव आणि मोबाईल क्रमांक लिहीणे अनिवार्य आहे. धनादेश महापालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या ड्रॉप बॉक्समध्येच टाकण्यात यावा. असे आवाहन मनपाच्या अतिरीक्त आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com