जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात असतांनाही दुकानात गर्दी दिसून आल्याने चित्रा चौकातील तीन तर राजकमल चौकातील एक अशा चार दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच काही दुकानदारांकडून दंडात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. कोरोना नियंत्रणासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात असतांनाही जळगाव शहरात मात्र बाजारपेठांमध्ये गर्दी केली जात आहे.

दरम्यान, सकाळी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली संजय ठाकूर, नाना कोळी, किशोर सोनवणे, सुनील पवार, शेखर ठाकूर, राहुल पवार यांच्यासह पथकाने चित्रा चौक, राजकमल चौक, सुभाष चौक, फुले मार्केटमध्ये पाहणी केली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यामुळे चित्रा चौकातील तीन तर राजकमल चौकातील एक अशा चार दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे.

मास्क न वापरणार्यांना दंड

कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र शहरात अनेक बेजबाबदार नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नसल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाच्या माध्यमातून मास्क न वापरणार्यांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली.

हातगाड्या जप्त

आकाशवाणी, स्वातंत्रचौक यासह रस्त्यांवर हातगाड्या लावून फळे विक्री करणार्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून, सहा ते सात हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहे.