जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जळगाव शहरातील विविध विकास कामांसाठी महापालिकेच्या सत्ताधार्यांनी निधीसाठी प्रस्ताव दाखल केला होता.

त्या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास 50 कोटींच्यावर निधी मंजूर झाला आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याचा दावा ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केला आहे.

महानगरपालिकेत अडीच वर्षे भाजपची सत्ता होती. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या वार्डात विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक करत होते.

त्यामुळे 15 नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी या प्रमाणे 15 कोटींचा निधी मिळण्यासाठीदेखील पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने प्रस्तावदेखील देण्यात आला होता. दरम्यान, भाजपचे 27 बंडखोर नगरसेवकांनी शिवसेनेशी हातमिळवणी केली. त्यामुळे भाजपकडून सत्ता जावून शिवसेनेच्या हातात महापालिकेची सत्ता आली.

दरम्यान, शहरातील विकासकामांसाठी सत्ताधार्यांनी तीन दिवसांत प्रस्ताव तयार केले. प्रस्तावाला तांत्रिक मान्यता घेवून ते जिल्हा प्रशासनाकडे पाठविले.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे सुमारे 50 कोटींच्यावर निधी मंजूर झाला आहे. मनपाच्या इतिहासात जिल्हा नियोजन समितीकडून एवढा मोठा निधी पहिल्यांदाच मंजूर झाल्याची चर्चा आहे.

याबाबतचे पत्र देखील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांना प्राप्त झाले आहे.