जळगाव कृउबा समितीला पुन्हा सहा महिन्याची मुदतवाढ

करोनामुळे विद्यमान सभापतींसह संचालक मंडळाला दिलासा
जळगाव कृउबा समितीला पुन्हा सहा महिन्याची मुदतवाढ

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात 23 मार्च 2020पासून लॉकडाऊन सुरु होता. सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्वाचे व आवश्यक असल्यामुळे राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नियत झाल्या आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे कृउबा समितीच्या संचालक मंडळाला सहा महिने पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. मुदत वाढीपेक्षा कोरोना संपला पाहिजे. बाजार समितीशी संबंधित शेतकरी, आडत व्यापारी, कामगार यांचे जीवन पूर्वपदावर येणे ही महत्वाचे आहे. कोरोनाचे संकट टळू दे आणि बळीराजासह सर्वांना सुखी ठेव,एवढीच अपेक्षा.

कैलास चौधरी, सभापती, कृउबा जळगाव

अशा वेळी बाजार समितीच्या निवडणुका वेळोवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे.

परंतु साथ रोग आटोक्यात येण्यास आणखी अवधी लागणार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका 24 जानेवारी 2021पासून 3 महिन्यासाठी पुढे ढकलण्याचे आदेश दिले होते.

या आदेशाची मुदत 23 एप्रिल 2021 रोजी समाप्त झाली आहे. जळगाव कृउबाला आता एक वर्ष पूर्ण होऊनही कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने पुन्हा राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला 23 ऑक्टोबरपर्यंत सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

त्यात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच्या बाजार समित्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. त्यांना फक्त अंतरीम व्यवस्था म्हणून काम पाहता येणार आहे, असे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव का.गो.वळवी यांनी आदेशात म्हटले आहे.

संचालक मंडळाला तिसर्‍यांदा मुदतवाढ

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत सप्टेंबर 2020 मध्ये संपली आहे. गेल्यावर्षीदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

त्यानंतर शासनाने पुन्हा निर्णय घेत या निवडणुकांना मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढतच असल्याने आता थेट ऑक्टोबरपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होणार नाही. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com