जळगाव - Jalgaon

शहरातील जुन्या जिल्हा परिषदेच्या मागे असलेल्या केळकर मार्केटमधील बाबा गारमेंट व त्रृषभ होजिअरी या दोन दुकाने फोडल्याची घटना आज 27 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास समोर आली आहे.

दोन्ही दुकानांमधून चोरट्यांनी 9 हजार 600 रुपयांची रोकड लांबविली. तर याच दरम्यान चोरट्यांनी बळीरामपेठ परिसरात धूमाकूळ घालत एका घराचे कूलूप तोडून घरातील 30 किलो, 750 रुपये किमतीचे गव्हाचे पोते व 1 हजार 500 रुपयांचे दोन होम थियटर असा मुद्देमाल लांबविला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील केळकर मार्केटमध्ये मनोजकुमार हुकूमचंद दुग्गड वय 52 रा. गणेश कॉलनी याचे मालकीचे दुकान नं 9 त्रृषभ होजिअरी आहे. याच दुकानाच्या शेजारी दुकान नं 8 हे प्रदीप लालचंद कटारिया रा. सिंधी कॉलनी यांचे बाबा गारमेंट हे आहे. 26 रोजी रात्री नेहमीप्रमाणे 8 वाजेच्या सुमारास दोघेही जण दुकाने बंद करुन घरी निघून गेले.

27 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुग्गड हे त्यांचा भाचा आनंदकुमार गिया यांच्यासह दुकानावर आले. त्यांना त्यांचे दुकानाला लावलेले कुलूप दिसून आले नाही. बाजूच्या बाबा गारमेंट या दुकानाचे कुलूपही दिसून आले नाही.

यानंतर दुग्गड यांनी बाबा गारमेंटचे प्रदीप कटारिया यांना फोन लावून प्रकाराची माहिती दिली .यानंतर कटारिया हे सुद्धा दुकानावर आले. दुकानात पाहणी केली असता दुग्गड यांच्या दुकानातील रोकड असलेले ड्राव्हर तोडून त्यामधील 9 हजार रुपये चोरट्यांनी लांबविले असल्याचे दिसुन असल्याचे दिसुन आले.

तर कटारिया यांच्या दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता तर त्यांच्याही दुकानातून 600 रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली होती

याचवेळी चोरट्यांनी बळीराम पेठेतील स्वप्नील अपार्टमेंटमधील रहिवाशी तसेच जनता बँकचे कर्मचारी विजय काशीनाथ देशमुख यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील 30 किलो गव्हाचे गोणी व 1 हजार 500 रुपये किमतीचे दोन होम थिएटर असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला असल्याचेही समोर आले.

तसेच बळीराम पेठेतील दत्त मंदिराच्या दानपेटीचे कुलूप तोडण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांचा तो प्रयत्न असफल ठरला. घटनेची माहिती मिळाल्यावर शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. केळकर मार्केटमधील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरटे कैद झाले असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या सर्व घटनांप्रकरणी मनोजकुमार दुग्गड यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उमेश भांडारकर हे करीत आहेत.