सुवर्णनगरीत जल्लोष
जळगाव

सुवर्णनगरीत जल्लोष

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

अयोध्येतील भूमिपूजन समारंभाच्या पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्णनगरीतही रामभक्तांनी बुधवारी आनंदोत्सव साजरा केला. काही संस्था, संघटनांच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील प्रशासनाचे आदेश, सोशल डिस्टन्सचे पालन करीत भक्तांनी विविध ठिकाणी महाआरती केली. तर अनेकांनी लाडू वाटप करुन भाविकांचे तोंड गोड केले. काही भागातील रस्त्यांवर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. तर काही ठिकाणी फटाके देखील फोडण्यात आले. या वेळी शहरातील विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त होता.

प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मंदिरे, धार्मिक स्थळे बंद होती. परंतु, आत मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम झाले. तर बहुसंख्य भाविकांनी घरातच रामांच्या मूर्ती अथवा प्रतिमांचे पूजन केले. महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सुद्धा त्यांच्या घराजवळ पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी दीप्ती चिरमाडे, श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ, महाराणा प्रताप मित्र मंडळाचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. महापौरांनी पेढे वाटप केले. या भागात काही जणांनी फटाके देखील फोडले.

रांगोळ्या अन् फटाके

नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले श्रीराम मंदिरासमोरील रस्त्यावर आणि कोर्ट चौकात काही रामभक्तांनी रांगोळ्या रेखाटल्या. त्यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण होते. या वेळी राजेंद्र नन्नवरे, आकाश फळे, राकेश लोहार आदी सोशल डिस्टन्स पालन करीत उपस्थित होते.

लाडू वाटप

बळीराम पेठेतील शिवाजी चौकात प्रशासनाचे नियम, सोशल डिस्टन्सचे पालन करीत एक हजार 111 लाडूंचे वाटप करण्यात आले. या वेळी अ‍ॅड.केदार भुसारी, संदीप ढंढोरे, राहुल घोरपडे, सुनील माळी, ललित भोळे, जगन परदेशी, ललित परदेशी आदी उपस्थित होते. याच भागातील रुद्रलाल हनुमान मंदिरात सायंकाळी कारसेवकांच्या हस्ते महाआरती झाली. तसेच या परिसरात काही तरुणांनी फटाके फोडून रामनामाचा जयघोष केला.

श्रीराम मंदिरात अभिषेक

श्रीराम मंदिर संस्थानच्या राम मंदिरात सोशल डिस्टन्सचे पालन करीत धार्मिक विधी झाले. नाशिक येथील गोदावरी, पंढरपूर येथील चंद्रभागा, मेहूण येथील तापी, गिरणाई आदी पंचनद्यांच्या जलाने उत्सव मूर्तीस अभिषेक करण्यात आला. सकाळी 11.40 ते दुपारी 12.15 वाजेदरम्यान वेद पठण झाले. मध्यान्ह वेळी भरत अमळकर यांच्या हस्ते महाआरती झाली. सायंकाळी 5 वाजता हरिपाठ, रामपाठ, श्रीराम रक्षा स्तोत्र पठण करण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजता धुपारती झाली. तसेच बालकीर्तनकार हभप श्रीधर जोशी यांचे कीर्तन झाले. त्यानंतर रात्री 8 वाजता अ‍ॅड.सुशील अत्रे यांच्या उपस्थितीत झाली. या मंदिरात विश्व हिंदू परिषदेचे संतोष दप्तरी यांनी विद्युत रोषणाई केली. मंदिर परिसरात सजावट करण्यात आली होती.त्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, शहरातील बहुसंख्य घरात श्रीरामांची आराधना करण्यात आली.

बॉम्ब शोध पथकामार्फत तपासणी

अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्ब शोध पथक, आरपीएफ, जीआरपीमार्फत बुधवारी रेल्वे स्टेशन परिसर, रथचौक, रामपेठेतील श्रीराम मंदिर, नवीन बसस्थानकाजवळील चिमुकले श्रीराम मंदिर परिसरात तपासणी करण्यात आली. कोणत्याही ठिकाणी संशयास्पद काहीही आढळले नाही.अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या वेळी जीआरपीचे उपनिरीक्षक राजेंद्र झेंडे, आरपीएफचे निरीक्षक पटेल, बीडीडीएसचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील कोळी, कॉन्स्टेबल अतुल चौधरी, रेवानंद साळुंखे, रामदास पारधी, काजीम देशमुख, शशिकांत बाविस्कर आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com