भुसावळ : हतनूर धरणाचे चौदा दरवाजे उघडले
जळगाव

भुसावळ : हतनूर धरणाचे चौदा दरवाजे उघडले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

13 हजार 845 क्युसेस पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या व सिंचन आणि बिगर सिंचनाकरीता महत्वाच्या अशा हतनूर धरणाचे दोन दरवाजे रविवारी पहाटे एक वाजेला अर्धा मीटरने उघडण्यात आले. मात्र दमदार पाऊस झाल्याने पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने सकाळी पुन्हा बारा दरवाजे उघडण्यात आल्याने एकूण चौदा दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे.

जिल्ह्यासह मध्यप्रदेशात पावसाने दमदार हजेरी लावल्याने तापी-पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून मुबलक जलसाठा निर्माण झालेला आहे. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत आहे, तर नदी परिसरात पाऊस सुरुच असल्याने पाण्याची आवकही वाढत आहे. त्यामुळे हतनूर प्रशासनाने धरणाचे चौदा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत.

त्यातून 13 हजार 845 क्युसेस वेगाने पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीला पुर आला असून ती खळाळून वाहू लागली आहे.

सद्य:स्थितीत धरणाची जलपातळी 210.070 मीटर आहे. गेल्या चोवीस तासात हतनूर धरण क्षेत्रात 17 मिलीमीटर पाऊस पडल्याने धरणात पाण्याची आवक वाढणार असल्याचे उपविभागीय अभियंता एन. पी. महाजन यांनी सांगितले. यावर्षी हतनूर धरणाचे पहिल्यांदाच दरवाजे उघड्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com