जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळा बाजार करणारे 14 जण जेरबंद

जळगावात दोन तर भुसावळात 1 गुन्हे दाखल; डॉक्टरसह लॅब असिस्टंड, मेडिकल चालकाचा समावेश
जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळा बाजार करणारे 14 जण जेरबंद

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्यात तुटवडा निर्माण झालेल्या रेमडेसिविरच्या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून 26 ते 33 हजार रुपये घेत त्यांची लूट करणार्‍या टोळीचा सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी पर्दाफाश केला.

भुसावळात एक तर जळगावात दोन ठिकाणी छापा टाकीत त्यांच्याकडून सात रेमडेसिविरचे इंजेक्शन जप्त करण्यात आले असून डॉक्टरसह लॅब असिस्टंड व मेडिकलचाका यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असल्याने करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविरच्या इंजेक्शनची मागणी देखील वाढतच आहे.

राज्यभरात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून अनेकांकडून हे इंजेक्शनसाठी अव्वाच्या सव्वा पैसे वसुल करीत लूट करीत असल्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहे.

दरम्यान जळगाव शहरातील काळ्या बाजारात चढ्या दराने या इंजेक्शनची विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना गुरुवारी मिळाली होती. त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार चिंथा यांनी दोन पथकांची नियुक्ती केली.

भादंवि कलम 420,188,34 सह औषध नियंत्रण किंमत आदेश 2013 चे परिशिष्ट 26 सह अत्यावश्यक वस्तू कायदा कलम 3 (7)(सी), 7 (1) (ए) (1), सह औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 व नियम 1945 चे कलम 18(सी) चे उल्लंघन दंडनिय 27 (बी) (2) व कलम 18 (2) चे उल्लंघन कलम 28 दंडनिय कलम 22 (1) (सीसीए) चे उल्लंघन दंडनिय कलम 22 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 14 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात देखील दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

छापा टाकताच टोळीचा पर्दाफाश

रेमडेसिविरची अव्वाच्या सव्वा दराने विक्री करणार्‍यांवर कुमार चिंथा व पथकांची नजर होती. गुरूवारी सकाळी 11 वाजता चिंथा यांच्या एका पथकाने स्वातंत्र्य चौकात अचानक छापा टाकला. याठिकाणी संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला.

याठिकाणाहून पोलिसांनी शेख समीर शेख सगीर (वय 23) रा.शिवाजीनगर याला ताब्यात घेतले.

त्याची विचारपुस केली असता त्याने नवल लालचंद कुंभार (वय-25) रा.खंडेरावनगर, सुनील मधुकर अहिरे (वय-32), रा.हरिविठ्ठलनगर), झुल्फीकार अली निसार अली सैय्यद (वय-21) रा.इस्लामपुरा, धानोरा.ता.चोपडा, मुसेफ शेख कय्युम (वय-28) रा.मास्टर कॉलनी, डॉ.आले मोहम्मद खान, सैय्यद आसीफ इसा (वय-22) रा.सुप्रीम कॉलनी, अझीम शहा दिलावर शहा (वय-20) रा.सालार नगर, जुनेद शहा जाकीर शहा (वय-23 ) रा.सालारनगर या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मजबुरीत रेमडेसिविर घ्या; मात्र त्याची माहिती देखील द्या

कोरोनाच्या काळात इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रेमडेसिविरची प्रचंड मागणी होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी ज्याठिकाणाहून अधिक दर देवून रेमडेसिविर खरेदी करुन ते आपल्या रुग्णांसाठी वापरा. परंतु त्याबाबतची माहिती पोलिसांना देत तक्रार करा, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. तसेच 7219091773 या क्रमांकार व्हॉट्सप करून तक्रार सुध्दा करता येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी यावेळी दिली.

पाच दिवसांची पोलीस कोठडी

स्वातंत्र्य चौकातून अटक करण्यात आलेल्या 14 जणांच्या टोळीला शुक्रवारी जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आठ जणांना अटक, डॉक्टर फरार

टोळीतील इतर सदस्यांना पोलिसांनी अटक केल्याचे समजताच हयात हॉस्पिटलमधील डॉक्टर हा घटनास्थळून पसार झाला. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, विजय कोळी, कैलास सोनवणे, महेश महाले, रवींद्र मोतीराया, रवींद्र तायडे, मनोज पवार, प्रशांत पाठक, रवींद्र साबळे, फिरोज तडवी यांच्या पथकाने केली. या टोळीकडून 5 रेमडीसिविर इंजेक्शन व दुचाकी, मोबाईल असा 2 लाख 46 हजार 950 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मेडिकल चालकासह तिघांना अटक

दुसरे पथकातील पोलीस निरीक्षक विलास शेंडे, राजेंद्र बोरसे, महेंद्र बागुल, प्रवीण भोसले, रवींद्र तायडे, मनोज पवार, योगेश ठाकूर यांनी नवकार फार्माचे आकाश अनिल जैन रा. आंबेडकर नगर, शुभम राजेंद्र चव्हाण (22) रा.झुरखेडा, ता. धरणगाव, मयूर उमेश विसावे (27) श्रध्दा कॉलनी हे तिघ रेमडेसिविर 22 ते 33 हजारात विक्री करत असतांना सापळा रचत रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन इंजेक्शनसह दुचाकी व मोबाईल असा एकूण 1 लाख 37 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com