लग्नात नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाईची 'अक्षता'

राज्यातील पहिलाच गुन्हा : 50 हजार दंडासह गुन्हा दाखल : मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांचा दणका
लग्नात नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाईची 'अक्षता'

जळगाव - Jalgaon :

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. लग्न समारंभासाठी केवळ 25 व्यक्तींची मर्यादा असून दोन तासांतच लग्नासाठी मुभा दिली आहे.

मात्र जळगावातील योगेश्वर नगर येथे लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संबंधितांना 50 हजार दंडासह वधू-वरांच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी केली असून राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

जळगावातील योगेश्वर नगरात गणपती मंदिराजवळ भागवत दोधू चौधरी यांचा मुलगा तारकेश्वर उर्फ सचिन व राजेंद्र विठ्ठल चौधरी यांची मुलगी मित्तल रा. धरणगाव यांचा विवाह सोहळ सुरु होता.

विवाह सोहळ्यात गर्दी झाली असून नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार दुपारी दोन वाजता उपायुक्त संतोष वाहुळे, मुकादम ज्ञानेश्वर कोळी, वैभव धर्माधिकारी, संजय पवार, यांचे पथकाने योगेश्वर नगर गणपती मंदिराजवळ विवाह सुरु असलेले ठिकाण गाठले.

याठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या 25 पेक्षा जास्त लोक गर्दी करुन असल्याचे दिसून आले. संबंधित प्रकाराचा उपायुक्तांशी व्हिडीओ काढला.

नियमांचे उल्लंघन केले म्हणून याप्रकरणी महापालिकेचे वाहन चालक अमोल बळीराम सपकाळे यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात लग्नसमारंभाचे आयोजक मुलाचे वडील भागवत दोधू चौधरी, छाया भागवत चौधरी रा. योगेश्वर नगर जळगाव व वधूचे वडील राजेंद्र विठ्ठल चौधरी व पुष्पा राजेंद्र चौधरी रा. धरणगाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधितांना महापालिकेने कायदेशीररित्या 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. चित्रणाची सीडी तयार करुन शनिपेठ पेलिस ठाण्यात पुरावा म्हणून सादर करण्यात आली आहे.

राज्यातील पहिलाच गुन्हा

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यावर नियंत्रणासाठी राज्याने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करून त्याबाबतचे आदेश कालच निर्गमीत केले. या आदेशानुसार दुसर्‍याच दिवशी जळगावातील योगेश्वर नगरात झालेल्या लग्न सोहळ्यात 25 व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती आढळून आल्याने जळगाव महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी 50 हजारांचा दंड वसूल करून वधू-वराच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ही राज्यातील पहिलीच कारवाई असल्याचे समजले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com