कुसुंबा येथे पती-पत्नीचा गळा आवळून खून

धक्कादायक घटनेने जिल्हाभरात खळबळ
कुसुंबा येथे पती-पत्नीचा गळा आवळून खून

जळगाव - Jalgaon :

तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात दाम्पत्यांचा दोरीने गळा आवळून खून झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास समोर आली.

मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील अशी मयत पती व पत्नीची नावे आहेत. घरातून मयत महिलेच्या अंगावरील दागिण्यांसह घराच्या कपाटातील रोकड व दागिणे असा पाच ते सात लाखांचा ऐवजही चोरीस गेला असल्याने दरोड्यातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून इतर कारणांचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे.

लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चौकशीसाठी मयत मुरलीधर पाटील हे ज्यांच्याकडे कामाला होेते, त्या मालकाची पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली. याबरोबरच परिसरातील नातेवाईकांसह अनेकांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

मारेकरी तीन ते चार असल्याची शक्यता

मुरलीधर पाटील हे महाबळ मधील दिलीप कांबळे या ब्रोकरकडे कामाला होते. कुसूंबा येथे गावात ते राहत होते. गेल्या वर्षी ते ओमसाई नगरात नवीन दोन मजली लिशान घरात वास्तव्याला गेले.

या घरात ते फक्त पती-पत्नी असेच राहत होते. दाम्पत्याला दोन मुली आहेत. मोठी मुलगी शीतल हिरालाल पाटील (24) हिचे चोपड्या तालुक्याती वेले येथील सासर आहे. ती कुसुंबा येथे वास्तव्यास आहे तर लहान मुलगी स्वाती उमेश पाटील ही (22) हिचे यावल तालुक्यातील सावखेडा येथील सासर असून ती नंदुरबार येथे वास्तव्याला आहे.

रात्रीची घटना दुपारी दोन वाजता झाली उघड

दाम्पत्याची यावल तालुक्यातील सावखेडा येथील मुलगी स्वाती हिने आज गुरुवारी दुपारी दोन वाजता आई वडिलांना फोन लावला. परंतू आई आणि वडील दोघांशी संपर्क होत नसल्याने स्वाती हिने याच परिसरात राहणारी आजी रुखमाबाई पाटील हिला फोन केला.

तसेच आई वडीलांचा फोन लागत नाहीये हे सांगत घरी जावून बघा असे सांगितले. स्वातीच्या फोननुसर रुखमाबाई ह्या घरी आल्या असत्या. हॉलचा दरवाज आतून बंद होता. मागच्या बाजूने किचनकडील असलेल्या दरवाजातून आत शिरल्यावर किचनच्या बाजूच्या खोलीत आशाबाई ह्या मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या.

घरात पाहणी करत मुरलीधर यांचा शोध घेतला असता, त्यांचा सुध्दा घराच्या गच्चीवर मृतदेह आढळून आला. यानंतर रुखमाबाई व यांच्यासह त्याच्यासोबत आलेले संतोष पाटील यांना धक्का बसला. यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांसह अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा घटनास्थळी पोहचला. शरीरावरील व्रण पाहता ही घटना रात्रीच घडली असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

घटनास्थळावरील चहाचे कप अन् चप्पलवरुन धागेदारे

घटनास्थळी दोरी मिळून आली असून याच दोरीने दाम्पत्यांचा गळा आवळून खून झाल्याचा संशय आहे. मुरलीधर व आशाबाई दोघांच्या गळ्यावर फास दिल्याचे व्रण आहेत तर शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत.

गच्चीवर मुरलीधर पाटील यांच्या मृतदेहाजवळ महिलेची चप्पल आढळून आली, हि चप्पल आशाबाई यांचे नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे घराच्या पोर्चमध्ये खाटीवर अंथरुन असल्याने मुरलीधर यांना मारेकरी खालून गच्चीवर घेवून गेले असावे, व त्याठिकाणी त्यांचा खून केला असण्याची शक्यता आहे.

दरम्यान घटनास्थळावर तीन ते चार जण चहाचे कप मिळून आले आहे. या चहाचे कप तसेच महिलेची मिळून आलेली चप्पल यावरुन संशयितांचे धागेदोरे मिळण्याची शक्यता असून यावरुन तीन ते चार जणांनी मिळून दाम्पत्याचा खून केल्याचा कयास आहे.

घरातून पाच ते सात लाखांचा ऐवज गायब

ओमसाई नगर हे गावाच्या अंत्यत बाहेर जंगल शिवाराच्या बाजूने आहे. मुरलीधर पाटील यांच्या घर अगदी विरळ वस्तीत आहे. तसेच दाम्पत्य हे दोघेच एवढ्या मोठया आलीशान घरात राहत होते. दुसरीकडे मयत आशाबाई यांच्या अंगावर पाच लाखाचे दागिने होते.

त्याशिवाय घरातील कपाटातील रोकड व दागिणे असा एकूण पाच ते सात लाखांचा ऐवज घरातून गायब असल्याने दरोडेखोरांनी हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच मुरलीधर पाटील यांचे भाऊ विलास राजाराम पाटील व साडू संतोष पुंडलिक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मुरलीधर पाटील यांचा बुधवारी दुपारी आणि रात्री रिक्षाचालकाशी दोन वेळा वाद झाला होता, त्यामुळे या वादाचा आणि घटनेचा काही संबंध आहे का? किंवा दरोडा अशा दोन्ही कारणांची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.

घटनेची संबंधित प्रत्येक कारणाची पडताळणी

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, विशाल वाठोरे, रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, इम्रान सय्यद यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले, विजय शामराव पाटील, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, प्रितम पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली. श्वान पथक, ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरम्यान गावात राहणारी मोठी मुलीचा आई आशाबाई व वडील मुरलीधर पाटील या दोघांशी वाद झालेला होता. पोलिसांनी या मोठ्या मुलीकडून कौटुंबिक पार्श्वभूमिसह वादाची कारणे, नातेवाईक यासह अनेक महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली.

त्या माहितीच्या आधारावर तपास सुरु आहेत. दरम्यान मुरलीधर पाटील हे एका ब्रोकरकडे कामाला होते. त्यात त्यांचे आलीशान घर याला अनुसरुनही खूनाच्या घटनेमागील कारणांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या घटनेने कुसूंबा सून्न झाले असून घटनास्थळी नागरिकांसह तरुणांची मोठी गर्दी जमली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com