बनावट कागदपत्र वापरुन संजय गांधी योजनेत 13 लाख 90 हजारांचा अपहार

पं.स. तील सहाय्यक लिपीकासह तिघांवर गुन्हा दाखल
बनावट कागदपत्र वापरुन संजय गांधी योजनेत 13 लाख 90 हजारांचा अपहार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

रेल्वे स्टेशन जवळील पंचायत समितीच्या कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या विभागात कार्यरत असलेले महसूल सहाय्यक लिपीकाने बनावट कागदपत्राच्या आधारे पत्नी व शालकाच्या बँकेच्या खात्यात परस्पर 13 लाख 90 हजार रूपये वर्ग करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशीरा शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्राच्या आधारे पैसे वर्ग

अधिक माहिती अशी की, शहरातील रेल्वे स्टेशन रोड येथील संजय गांधी योजना मअफ वर्ग नगरपालिका क्षेत्र येथील कार्यालयात महसूल सहाय्यक लिपीक म्हणून असलेले संदीप प्रल्हाद शिरसाठ रा. आम साईराम नगर, वाघ नगर यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे पत्नी सोनल संदीप शिरसाठ आणि स्वताच्या खात्यात नोव्हेबर ते डिसेंबर 2020 या दोन महिन्याचे योजनेच बील अनुक्रमे 20 हजार आणि 40 हजार रूपये वर्ग करून घेतले.

त्यानंतर जानेवारी ते मार्च 2021 च्या योजनाच्या बिलांमध्येही फेरफार करून पत्नी सोनल शिरसाठ आणि शालक संदीप अशोक भालेराव यांच्या खात्यात 13 लाख 50 हजार रूपये वर्ग व्हावे यासाठी दोघांचे खाते क्रमांक दिले होते.

तहसीलदारांच्या तपासणीत प्रकार उघड

परंतू 13 लाख 50 हजार रूपयांची रक्कम वर्ग करतांना बँकेला एकच खाते क्रमांक वारंवार येत असल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेने थेट संजय गांधी योजनेचे तहसीलदार यांना पत्र कळवून दोन नावे वेगवेगळी आणि खाते क्रमांक एकच असल्याचे कळविले.

त्यानुसार तहसीलदार यांनी मुळ लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी केल्यानंतर ही तफावत दिसून आली. महसुल सहाय्यक लिपीप शिरसाठ यांनी शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले.

शासनाची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी अनिल पठाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात महसूल सहाय्यक लिपीक संदीप प्रल्हाद शिरसाठ, पत्नी सोनल संदीप शिरसाठ आणि शालक संदीप अशोक भालेराव या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com