चौगुले प्लॉट गोळीबार प्रकरण : पाच जणांना अटक

आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी : इतर संशयित फरार
चौगुले प्लॉट गोळीबार प्रकरण : पाच जणांना अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

व्हाट्सअपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवल्याने चौगुले प्लॉट भागात सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

रात्री उशीरा याप्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध शनी पेठ पोलीस ठाण्यात दंगल व आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सारवान गटाच्या राम उर्फ सोनू भगवान सारवान, निलेश नरेश हंसकर, लखन भगवान सारवान, सनी राजू मिलांदे सर्व रा. गुरुनानक नगर, व पंकज भानुदास चौधरी रा. चौघुले प्लॉट या पाच जणांना रात्रीतून अटक करण्यात आली आहे. आज सोमवारी सर्वांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल होतेवेळी पोलीस अधीक्षक शनिपेठ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. दोघांच्या फिर्याद घेतल्यानंतर स्वतः पोलीस अधीक्षकांनी तपासून पाहिल्या. यानंतर रात्री उशीरा दोन्ही गटाच्या विरोधात आपसात तक्रारी घेण्यात आल्या.

यात अमृत यशवंत शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनू भगवान सारवान, निलेश नरेश हंसकर, लखन भगवान सारवान, विक्रम राजू सारवान, हेमंत घुसर व सनी मिलांदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर नीलेश रमेश हंसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजय जयवंत शिंदे राहुल अशोक शिंदे किशोर जयवंत शिंदे राकेश उर्फ लिंबू राख्या चंद्रकांत साळुंके (सर्व रा. चौघुले प्लॉट) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.

गुन्हा दाखल झाल्यनंतर शनिपेठ पोलिसांनी सोनू सारवान, निलेश हंसकर, लखन सारवान, सनी मिलांदे व पंकज चौधरी यांना अटक करण्यात आली होती. त्यांना आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने पाचही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या गुन्ह्यात शिंदे गटातील संशयित फरार असून त्याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

गावठी पिस्तूल अन् लिंबू राक्या पुन्हा चर्चेत

गेल्या काही वर्षापूर्वी मू.जे. महाविद्यालयात तरुणाचा खून झाला होता. या खूनाच्या घटनेत लिंबू राक्या चर्चेत आला होता. लिंबू राक्या हा पोलिसांचा रेकार्डवरील गुन्हेगार आहे.

गेल्या वर्षी त्याला स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळून गावठी पिस्तूलासह अटक केली होती. आता चौघुले प्लॉटमध्ये रविवारी निलेश हंसकर याने दिलेल्या फिर्यादीत लिंबू राक्याने गावठी पिस्तूल काढून गोळीबार केल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे आता गावठी पिस्तूल व लिंबू राक्या हे पुन्हा समोर आले आहे. दरम्यान या दोन्ही गटाच्या वादात नेमका लिंबू राक्या कसा पडला ? घटनेच्या वेळी त्याच्याकडे जर गावठी पिस्तूल होते.

तर अगदी नियोजनबद्धरित्या लिंबू राक्याच्या माध्यमातून सारवान गटातील कुणाला संपविण्याचा तर शिंदे गटाचा डाव नव्हता? असेही प्रश्न उपस्थित होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com