जळगाव - Jalgaon :

कर्ज काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून चार महिलांच्या नावे बचतगटाचे परस्पर 80 हजार रूपयांचे कर्ज काढून फसवणूक केल्याचा प्रकार तालुक्यातील सुभाषवाडी येथे 23 मार्च रोजी उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथील छायाबाई कैलास राठोड (वय 26) यांच्यासह ललिताबाई तुकाराम चव्हाण, अक्काबाई पंडीत चव्हाण, गिरीजाबाई युवराज राठोड, गिताबाई रमेश राठोड, रुख्माबाई भंगलाल चव्हाण या महिलांना बचतगटातून प्रत्येकी 20 हजार रुपये कर्ज काढुन देण्यासाठी गावातच राहणार्या नवल त्र्यंबक राठोड याने मदत केली.

यासाठी राठोड याने एप्रिल 2019 मध्ये या सर्व महिलांचे आधारकार्ड, पासपोर्ट फोटो असे आवश्यक कागदपत्र गोळा करुन गणेश कॉलनीतील एचडीएफसी बँकेत जमा केले. यात अक्काबाई व गिरीजाबाई या दोघांचीच कर्ज मंजुर झाले, तर इतरांचे नामंजुर झाल्याचे नवलने सांगीतले.

कागदपत्रांवरील फोटो व बदलविला मोबाईल क्रमांक

अक्काबाई व गिरजाबाई यांना प्रत्येकी 20 हजार रुपये भेटले होते. यानंतर इतर महिला पाचोरा येथील स्वतंत्र्य फायनान्स येथे बचतगटाचे कर्ज घेण्यास गेले असता दोन्ही महिलांच्या नावे एचडीएफसी बँकेत प्रत्येकी 14 हजार 700 रुपये थकीत कर्ज असल्याचे दिसून आले. त्यानुसार महिलांनी पुन्हा नवल राठोड याच्याकडे विचारणा केली.

तसेच बँकेत जाऊन चौकशी केली. यावेळी संबधित महिलांच्या मुळ कागदपत्रांवरील फोटो व मोबाईल क्रमांक बदलुन त्यांच्या नावावर प्रत्येकी 20 हजार असे एकुण 80 हजार रुपये कर्ज एप्रिल 2019 मध्येचे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.

फसवणुक झाल्याचे कळताच पोलिसात धाव

या महिलांची फसवणूक झाल्याचे समारे येताच संबधित प्रकरण गोपाळ कोळी (पुर्ण नाव माहित नाही) याने केल्याचा समोर आहे. कोळी याने अक्काबाई व गिरजाबाई यांचे कर्ज मंजुर करण्यासाठी प्रत्येकी 800 रुपये कमिशन नवलकडून घेतले होते.

तर इतर चार महिलांचे कर्ज प्रकरण नामंजुर झाल्याचेही त्याने सांगीतले. प्रत्यक्षात मात्र या चारही महिलांच्या नावे देखील त्याने परस्पर कर्ज काढुन घेतल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी छायाबाई राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि. किशोर पवार तपास करीत आहेत.