जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील उच्चभ्र वस्ती समजल्या जाणार्या मोहाडी रोड परिसरातील दौलतनगर येथे सहा जणांनी बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घरात घुसून चाकूच्या धाकावर 3 लाख रुपये रोख व 20 लाखांचे दागिणे असा एकूण 23 लाखांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे,

दरम्यान डीव्हीआर बॉक्स व मोबाईल घेतल्यानंतर दरोडेखोरांपैकी एकाने झालेला प्रकार पोलिसांना सांगायच नाही. पोलिसांना सांगितले तर सहा महिन्यांनी आम्ही परत येवू. आणि तेव्हा तुम्हाला जीवे मारु, अशी धमकी दिली.

यानंतर सव्वा तीन वाजेच्या सुमारास घरात घुसलेले दरोडेखोर चार वाजेच्या सुमारास पाऊण तासानंतर घराबाहेर पडले. भयभीत झालेल्या दापत्याने नातेवाईकांना प्रकार कळवित सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलिस स्टेशन गाठले.

व घडलेल्या प्रकाराची हकीकत पोलिसांना सांगितली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस स्टेशनला रात्री उशीरापयर्र्त गुन्हा दाखलची कार्यवाही सुरू होती.

व्यापार्यासह पत्नी मुलगी तिघेच होते घरी

दौलतनगर येथे पिंटू बंडू इटकरे वय 35 हे पत्नी मनीषा व तीन वर्षांची मुलगी हरीप्रिया यांच्यासोबत वास्तव्यास आहेत. इटकरे यांचा लोखंडी रॉड आसार्यांचा होलसेलचा व्यवसाय असून ट्रेडिंग कंपनी आहे. पिंटू इटकरे यांचे वडील सुप्रीम कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. आई व वडील हे कोल्हे हिल्स परिसरात वास्तव्यास आहेत. नेमके मंगळवारीच पिंटू इटकरे व त्यांची पत्नी हे दोघेच घरी होते. ऐरवी त्यांचे आई वडील हे त्यांच्या सोबतच राहत असतात. या घटनेमुळे कुटुंबिय भयभीत झाले आहे.

मुलीला शांत करा, आवाज केला तर सर्वांना जीवाने मारेन

दरोडेखोरांच्या आवाजाने चिमुकली उठली व रडायला लागली. मुलीला दरोडेखोरांनी पिंटू इटकरे यांच्याकडे दिले. मुलीला शांत बसवा, तिचे रडणे थांबवा, तसेच तुम्हीही कुठलाही आवाज करु नका, नाहीतर सर्वांना जीवाने मारेन अशी धमकी दिली. यावेळी इटकरे यांनी चिमुकली हरिप्रिया हिला शांत केले.

3 लाखांची रोकड, 20 लाखांचे दागिणे घेवून पसार

इतर दरोडेखोरांनी इटेकर दाम्पत्याला दागिणे रोकड कुठे ठेवली आहे, जेवढ असेल तेवढ काढून द्या असे सांगितले. यानंतर मनिषा इटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे दरोडेखोरांनी बेडरुमसह इतर खोल्यांमधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकत तीन लाखांची रोकड व दागिन्यांचे बॉक्स काढले. या प्रत्येक बॉक्समधील दागिणे यांनी सोबत घेत दागिण्याचे रिकामे बॉक्स घरात फेकले. तीन लाखांची रोकड व पिंटू इटेकर यांच्याासह त्यांची पत्नी मनिषा यांचे एकूण असे 20 लाखांचे दागिने असा एकूण 23 लाखांचा ऐवज लुटून नेला. पिंटू इटेकर यांच्या मामाच्या मुलीचे लग्न असल्याने त्यासाठी इटेकर दाम्पत्य दोन्ही लग्नाला जाणार होते. या लग्नासाठी दागिणे घालून जाण्यासाठी घरात ठेवले असल्याचे इटेकर यांनी बोलतांना सांगितले.

मोबाईल अन् सीसीटीव्ही डीव्हीआर बॉक्स सोबत नेला

इटकरे यांच्या घरात तसेच बाहेर सीसीटीव्ही कॅमरे लावले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये आपण कैद झाले असल्याच्या भितीने घरातील दागिणे व रोकड असा ऐवज लुटल्यानंतर चोरट्यांनी इटकरे यांना सीसीटीव्ही कॅमेर्याचा डीव्हीआर बॉक्स कोणत्या ठिकाणी आहे अशी विचारणा केली. यानंतर डीव्हीआर बॉक्स असलेल्या कपाटाची चाबी घेवून डीव्हीआर बॉक्स तसेच इटकरे यांच्या घरातील त्यांचा व त्यांची पत्नी असे दोन्हीचे मोबाईल सोबत घेतले. घरातून घेतलेले मोबाईल जातांना खालच्या गेेटजवळ ठेवून दरोडेखोर पसार झाले.

पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

रामानंदनगर पोलिसांकडून घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह तसेच ठसे तज्ज्ञांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या इतर कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक डॉ मुंढे यांनी दाम्पत्याकडुन सविस्तर माहिती जाणून घेत संपूर्ण घरात पाहणी केली. तसेच अधिकार्यांसह कर्मचार्यांना तपासाच्या सूचना दिल्या.

दोरीने हात बांधले, गळ्याला लावला चाकू

पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास तोंडाला मास्कसह रुमाल बांधलेले तसेच हातात धारदार शस्त्र असलेले सहा जण लाकडी दरवाजा कटरने कापुन आतील कडी उघडुन इटकरे यांच्या घरात घुसले.

घरात घुसताच सर्वांनी सर्व खोल्यांमध्ये चाचपणी केली. यानंतर इटकरे दाम्पत्य झोपलेले असलेल्या बेडरुममध्ये गेले. याठिकाणी त्यांनी इटकरे यांची पत्नी मनीषा हिला उठून तिचे तोंड दाबले.

यानंतर पत्नी मनीषाने पिंटू इटकरे यांना उठवताच दरोडेखोरांपैकी एकाने पिंटू इटकरे यांच्या गळ्याला धारदार चाकू लावला. तसेच दुसर्या दरोडेखोराने इटकरे यांचे दोन्ही हात बांधले.

दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद

पिंटू इटकरे यांच्या घरा शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात दरोडेखोर कैद झाले आहे. 3 वाजून 12 मिनिटांनी एक एक करत दरोडेखोर गेटवरुन उडी मारुन मध्ये आले. यानंतर इटकरे यांच्या घरात शिरले.

यात एक दरोडेखोर दुसर्या एका दरोडेखोराच्या पाठीवर बसून सीसीटीव्ही कॅमेरा वाकवित असल्याचेही कैद झाले आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेची यंत्रणा संशयितांच्या शोधार्थ कामाला लागली आहे.

या परिसरातील प्रत्येक दुकान तसेच घराच्या सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज हस्तगत केले. दरम्यान मोलकरणीचीही कसून चौकशी केली आहे.