जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

वेफर्सचे पैसे मागितले म्हणून गांधी मार्केटजवळ वेफर्स विक्रेता विजय आत्मारात भोई (वय-30, रा. शाहूनगर) या तरुणाच्या चेहर्यावर गांजाच्या नशेत असलेल्या तरुणाने धारदार पट्टीने वार करीत प्राणघातक हल्ला केल्याची घटना

आज दुपारी 5.45 वाजेच्या सुमारास घडली. जखमी तरुणावर जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दखल करण्याचे काम सुरु होते.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शाहूनगरातील रहिवासी विजय आत्माराम भोई हा तरुण गांधी मार्केटच्या बाहेर वेफर्स विक्रीचा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावतो.

आज दुपारच्या सुमारास बाळू नावाचा तरुण याठिकाणी आला. त्याने विजयला वेफर्स मागितले असता त्याने वेफर्स घेतले परंतु त्याला पैसे न देता उलट त्याला शिवीगाळ करु लागला. यावेळी दोघांमध्ये किरकोळ वाद झाल्याने विजय हा तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात आला.

पोलिसांनी बाळू नामक तरुणाला देखील यावेळी पोलिस ठाण्यात आणले. परंतु यावेळी पोलिसांकडून दोघांना समज देवून त्यांना परत पाठवून देण्यात आले असल्याचे विजयने पोलिस अधिकार्यांना सांगितले.

रक्ताच्या थारोळ्यात पोलीस ठाण्यात दाखल

धारदार पट्टीने विजयच्या चेहर्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेतच इतर विक्रेत्यांनी विजयला शहर पोलिस ठाण्यात आणले. यावेळी विजयचे संपुर्ण कपडे रक्ताने माखले होते. दरम्यान विजयच्या चेहर्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी विजयवर उपचार सुरु असून त्याच्या चेहर्यावर गंभीर जखमा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अन् पुन्हा येऊन केले वार

सायंकाळच्या सुमारास बाळू हा पुन्हा गांजाच्या नशेत विजयकडे आला आणि त्याला पुन्हा शिवीगाळ करु लागला. यावेळी विजयने पोलिस ठाण्यात फोन करीत हा मला पुन्हा शिवीगाळ करीत असल्याचे सांगताच बाळूने त्याच्याकडील धारदार पट्टीने विजयच्या चेहर्यावर वार करीत त्याला जखमी करीत बाळू घटनास्थळहून पसार झाला.

पोलिसांकडून केवळ थातूर-मातूर कारवाई

गांधी मार्केटच्या वरच्या मजल्यावर नेहमीच नशा करणार्यांचा वावर असतो.नशा करण्यांसाठी हा एक अड्डाच बनला असून दिवसभर याठिकाणी गांजा व बाँड ओढणार्यांचा वावर असतो. हे नशेखोर याठिकाणी नशा केल्यानंतर मार्केटबाहेरील हातगाडी चालकांसह दुकानदारांना त्रास देण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहे.

अनेकदा त्यांनी विक्रेत्यांनी हुज्जत घालीत धमक्याही दिल्या आहे. अनेक वेळा तक्रार करुनही पोलिसांकडून केवळ थातूरमारतूर कारवाई करुन त्यांना सोडून देत जाते. त्यांच्यावर कडक कारवाई होत नसल्याने या नशेखोरांची मजल आता प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत पोहचली असल्याचे दिसून येत आहे.