जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात महामार्गावर धावणार्या तसेच थांबलेल्या वाहनांमधून माल लांबविणार्या गुजरातमधील टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

इद्रीस मोहम्मद कालू (38), मोहम्मद बशीर शेख (35) व शोएब हुसेन जभा (37) सर्व रा.गोध्रा, गुजरात या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान तिघांनी वरणगाव येथे उभ्या ट्रकमधून साडे सात लाख रुपये किमतीचे खाद्य तेल लांबविले होते. यानंतर आणखी दुसरा गुन्हा करण्याच्या तयारीत असतांनांच गुन्हे शाखेने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

वरणगाव पोलिसात होता गुन्हा

वरणगाव येथे नागपूर महामार्गावर खाद्य तेल भरलेला ट्रक (क्र.एम.एच.19सी.वाय.6002) लावण्यात आलेला होता. त्यात 7 लाख 37 हजार 345 रुपये किमतीचा तेलाचा साठा होता. 23 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी हा ट्रक चोरट्यांनी मध्यरात्री लांबविला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या पथकाला केले होते रवाना

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी वरणगाव येथील ट्रक लांबविल्याच्या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा व वरणगाव पोलिसांना दिले होते. वरणगाव येथून ट्रक व तेल चोरणार्या संशयिताबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, सहायक फौजदार राजेंद्र पाटील, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील व दीपक पाटील यांचे पथक रविवारी सकाळी रवाना केले.

वरणगाव पोलिसांच्या स्वाधीन

वर्णन व गुप्त माहितीच्या आधारावर या पथकाने सापळा रचून इद्रीस मोहम्मद कालू, मोहम्मद बशीर शेख व शोएब हुसेन जभा या तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांचे आधारकार्ड व इतर कागदपत्रांची तपासणी केल्यावर हे गुजरातचे असल्याचे निष्पन्न होऊन खात्री पटली. पोलीसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी वरणगाव येथून ट्रक व तेल चोरल्याची कबुली दिली आहे. शिरपूर-चोपडा रस्त्यावर आणखी असाच गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचेही संशयितांनी सांगितले. तिघांना पुढील कार्यवाहीसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरणगावचे सहायक निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहे.