जळगाव : दौलतनगरात प्राचार्यांकडे सात लाखांची घरफोडी
जळगाव

जळगाव : दौलतनगरात प्राचार्यांकडे सात लाखांची घरफोडी

Balvant Gaikwad

जळगाव | प्रतिनिधी

मोहाडी रोडवरील दौतलनगरातील रहिवासी व किडस् गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मीनल संतोष जैन यांचे बंद घर चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यात चोरट्यांनी दीड लाख रुपये रोख, दागिने असा सुमारे सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मीनल जैन या त्यांचे आई, वडील, भाऊ, भावजयी यांच्यासह गिरणा पंपींग रोडवरील किडस् गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुमारे महिनाभरापासून राहत आहेत. त्या ठिकाणी जैन कुटुंबीय व इतर मंडळी मास्क आदी बनवण्याचे काम करीत आहेत.

मीनल जैन तीन दिवसांपूर्वी दौलतनगरातील घरी जावून आल्या होत्या. त्यानंतर त्या घराला कुलूप लावून पुन्हा स्कूलमध्येच कुटुंबीयांसह राहत होत्या. परंतु, त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा  तोडल्याचे शेजारील रहिवासी गजानन मराठे यांच्या मंगळवारी सकाळी लक्षात आले.  याबाबत मराठे यांनी तत्काळ प्राचार्या जैन यांना मोबाइलवर कळविले. जैन यांनी त्वरित घरी येवून पाहिले असता चोरट्यांनी बराच मोठा मुद्देमाल लांबवल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त केला आहे.

याबाबत कळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी श्‍वान पथकही पाचारण केले. तसेच पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com