कुटुंबिय वरच्या घरात अन् चोरट्यांनी खालचे घर फोडले

तांबापुरा परिसरात दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांंबविला ; शेजारच्या घराच्या कड्या बंद करुन चोरी
कुटुंबिय वरच्या घरात अन् चोरट्यांनी खालचे घर फोडले

जळगाव - Jalgaon

शहरातील तांबापुरा (Tambapura) परिसरात असलेल्या फुकटपुरा भागात कुटुंबिय वरच्या खोलीत झोपले असतांना चोरट्याने खालचे बंद घर लक्ष करुन दीड लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता समोर आली. चोरी करतांना चोरट्याने वरती झोपलेल्या घराच्या तसेच शेजारच्यांच्या बाहेरुन कड्या लावून ही चोरी केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी घरमालकाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

जळगाव शहरातील तांबापुरा (Tambapura) परिसरातील फुकटपुरा येथे सरफराज खान अयुब खान हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते व त्यांचा मुलगा दोन्ही खाजगी वाहन चालक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री सरफराज खान यांचा मुलगा बाहेरगावी गेलेला होता. रात्री १० च्या सुमारास खान कुटुंबीय खालील घराला कुलूप लावून वरील माळ्यावर झोपण्यास गेले.

मध्यरात्री चोरट्यांनी खान यांच्या वरील खोलीला आणि शेजारी राहणार्‍या इतर घराला बाहेरून कड्या लावल्या. तसेच खान यांच्या घराचा कडी कोंडा तोडत घरातील कपाटामधून १५ ग्रॅम सोन्याची पोत, चांदीचे कडे, चांदीची पोत, चांदीची अंगठी, १२ हजार रोख असा दीड लाखांचा ऐवज लांबविला.

मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सरफराज खान हे उठले असता दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी शेजार्‍यांची संपर्क साधला. शेजार्‍यांचा देखील दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी परिसरातील इतर काही नागरिकांना संपर्क करून बोलावले. खान कुटुंबीय खाली आल्यानंतर त्यांच्या खालच्या घरात कडी कोयंडा तुटलेले तर घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला.

चोरीची खात्री झाल्यावर सरफराज खान यांनी एमआयडीसी पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांची घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. याप्रकरणी खान यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com