गोळीबारप्रकरणी दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

गोळीबारप्रकरणी दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील पिंप्राळ्यात मयुर कॉलनी येथे उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात सोमवारी सायंकाळी रामानंदनगर पोलिसांनी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून उमेश पांडुरंग राजपूत वय 29 व किरण शरद राजपूत वय 21 या दोन जणांना अटक केली.

या दोघांना मंगळवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांना 29 जुलै पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यासह त्यांच्या मयुर कॉलनी येथील घरावर गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वाजेच्या सुमारास घडली होती.

याप्रकरणी उमेश राजपूत, महेंद्र राजपूत, भूषण बिर्‍हाडे व मंगल राजपूत या चौघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

चौकशीत पोलिसांनी किरण राजपूत तसेच जुगल बागूल हे आणखी दोन संशयित निष्पन्न केले होते. संशयित उमेश राजपूत व किरण राजपूत हे दोघेही जामनेर तालुक्यात मालखेडा येथे असल्याची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्यासह पथकाने सोमवारी सायंकाळी उमेश व किरण या दोघांना अटक केली.

फरार संशयितांचा शोध सुरु

अटक केलेल्या उमेश राजपूत व किरण राजपूत या दोघा संशयितांना मंगळवारी तपासअधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांनी जिल्हा न्यायालयात हजर केले. मुख्य संशयितांसह इतर संशयित फरार असून गुन्हयात वापरलेले पिस्तूल हस्तगत करणे बाकी आहे, गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे.

गुन्हयात वापरलेली चारचाकी हस्तगत करणे बाकी आहे, या कारणांच्या आधारावर पोलिसांनी संशयितांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.

सरकार पक्षाच्या युक्तीवादाअंती न्यायालयाने दोघांना 29 जुलै पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हयात गोळीबार करणारा मुख्य संशयित महेंद्र राजपूत यांच्यासह भूषण बिर्‍हाडे, जुगल बागुल हे तिघेही फरार असून त्यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com