कर्ज फेडण्यासाठी तरुणांकडून चोरीचा उद्योग

कर्ज फेडण्यासाठी तरुणांकडून चोरीचा उद्योग

आव्हाण्यातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक तर एक फरार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

स्वत:वर असलेले कर्ज फेडण्यासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची चोरी करणार्‍या जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील सागर उर्फ गोल्या रमेश मोरे (वय 23) व आकाश ज्ञानेश्वर शिंदे (वय 19) या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून एक ट्रॉली हस्तगत करण्यात आली असून दोघांचा आणखी एक साथीदार फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरसोली येथे जळके रस्त्यावरुन चार महिन्यापूर्वी या तिघांनी ट्रॉली चोरी करुन तिचा चेचीस क्रमांक खोडला व रंग बदलवून विक्री केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार हवालदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहूल पाटील व अशोक पाटील यांच्या पथकाने जळगाव तालुक्यातील आव्हाणे गाठून सागर व आकाश याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने ट्रॉली चोरल्याची कबुली दिली.

तसेच एका सहकार्‍याचे नाव सांगितले, त्याला पैशाची गरज असल्याने त्याच्याच ट्रॅक्टरच्या सहाय्याने शिरसोली येथून ट्रॉली लांबविल्याची कबुली दिली. दरम्यान, त्याने ज्याला ही ट्रॉली विकली होती, त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे.

आणखी ट्रॉल्या मिळण्याची शक्यता

आव्हाणे येथील एका तरुणावर कर्ज असल्याने या कर्जाची फेड करण्यासाठी त्याने स्वत:चे ट्रॅक्टर घेऊन सोबत आकाश व सागर या दोघांना नेत शेतकर्‍यांच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली चोरण्याचा उद्योग सुरु केला होता. वडली, ता.जळगाव येथूनही काही महिन्यापूर्वी प्रदीप प्रेमराज पाटील या शेतकर्‍याची ट्रॉली चोरी झालेली आहे. त्यांच्याकडून आणखी ट्रॉली मिळण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com