पोलीस अधीक्षकांच्या तंबीनंतर त्या उपद्रवी तरुणाविरोधात गुन्हा दाखल

पोलीस अधीक्षकांच्या तंबीनंतर त्या उपद्रवी तरुणाविरोधात गुन्हा दाखल

पोलिसाला शिवीगाळ करत स्वतःवर केले होते ब्लेडने वार : शहर पोलीस ठाण्यातील धक्कादायक घटना

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

दारु प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून सागर महारु सपकाळे उर्फ सागर पट्टी (रा.प्रजापत नगर) याने शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ करत स्वत:च्या हातावर ब्लेडने वार केले व त्यांच्याविरुध्द तक्रार करण्याची धमकी दिल्याची घटना बुधवार, 14 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.

नेहमीच प्रकार असल्याने त्याबाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर असा प्रकार पुन्हा घडला तर संबंधिताविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सुचना अधिकार्‍यांना केल्या आहेत. वारंवार होणार्‍या या प्रकारातून अनुचित घटना घडणार नाही, यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई संबधितांवर करण्यात येईल

डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

दरम्यान संबंधित तरुण उपद्रवी असल्याने तसेच डोक्याला ताप नको, म्हणून कर्मचार्‍यांनी गुन्हा दाखल करणे टाळले. पोलीस अधीक्षकांच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर त्यांनी प्रभारींना दिलेल्या तंबीनंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास सागर सपकाळे विरोधात शासकीय कामात अडथळा व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.

संपूर्ण पोलीस ठाण्यात रक्तच रक्त...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा मद्याच्या आहारी गेला असून दारु पिण्यासाठी सतत पोलिसांकडे पैशाची मागणी करीत असतो. बुधवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात येऊन त्याने मद्याच्या नशेतच पोलिसांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. मद्यपी म्हणून पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

मात्र त्याच्या या ओरडण्यामुळे पोलीस ठाण्यात मोठी गर्दी जमा झाली होती. त्याला बाहेर काढत असताना हवालदार रवींद्र पाटील यांच्याकडे त्याने शंभर रुपये मागितले. नाही दिले तर अंगावर ब्लेडने वार करुन येथेच आत्महत्या करतो, असा दम भरला. पाटील यांनी पैसे न दिल्याने त्याने स्वत:च्या हाताने अंगावर, हातावर, पायावर व गळ्यावर ब्लेडने वार केले.

हे वार तुम्हीच केले असे वरिष्ठांना सांगतो असा दम भरला. त्याला आवरायला गेलेल्या पाटील यांची कॉलर पकडून त्याने पुन्हा शिवीगाळ केली. पोलिसांनी त्याला तेथून बाहेर काढले. यावेळी पोलीस ठाण्यात ठिकठिकाणी रक्त रक्तच सांडले होते. सपकाळेला समजविण्याच्या प्रयत्नात कर्मचार्‍यांचे संपूर्ण कपडेच रक्ताने माखले होते.

गुन्हे शोध विभागाचे कर्मचारी गायब

गोंधळ घालणारा सपकाळे हा नियंत्रणात येत नसल्याने तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्मचार्‍यांची गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांना संपर्क साधला. मात्र गुन्हे शोध पथकातील कुणीही कर्मचारी याठिकाणी आला नाही. त्यानंतर कर्मचार्‍यांनी कंटोल रुमलाही फोन केला होता. याचदरम्यान गजानन बडगुजर या कर्मचार्‍याने पोलीस स्टेशन गाठले, व सागर सपकाळे यास हात धरुन बाहेर काढत शहर पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर नेवून सोडले, तसेच त्यानंतर सपकाळेला त्याच्या पत्नीच्या स्वाधीन केले.

सपकाळेने यापूर्वी एकदा गुन्हे शोध विभागात येवून कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली होती, नेहमीचा ताप असल्याने गुन्हे शोध विभागातील कर्मचार्‍यांनी येणे टाळल्याची चर्चा आहे.

अधीक्षकांकडून कानउघाडणी अन् गुन्हा झाला दाखल

सपकाळे याच्या गोंधळ घातल्याच्या प्रकाराबाबत कर्मचार्‍यांनी वरिष्ठांनीही कळविले टाळले. सायंकाळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना प्रकाराची माहिती मिळाल्यावर त्यांनी प्रथम प्रभारी अधिकार्‍यांना खडे बोल सुनावत, संबंधित प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यादरम्यान गायब झालेल्या तसेच फोन करुनही न आलेल्या गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांचीही अधीक्षकांनी चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अधीक्षकांच्या कानउघाडणीनंतर रात्री हवालदार रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन सागर सपकाळे विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केला व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक भिमराव नांदुरकर करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com