आकाशवाणी चौकातील मेडीकल फोडणार्‍याला जालन्यातून अटक

रामानंदनगर पोलिसांनी खामगाव पोलिसांकडून घेतले ताब्यात : तीन दिवसांची पोलीस कोठडी
आकाशवाणी चौकातील मेडीकल फोडणार्‍याला जालन्यातून अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील आकाशवाणी चौक परिसरातील रस्त्यालगतचे तीन मेडीकल 20 जून रोजी पहाटे चोरट्यांनी लक्ष्य करुन अपेक्स या मेडीकलमधून कामगाराची घड्याळ व 7 हजार 200 रुपये रोख लांबविले होते, इतर दोन ठिकाणाहून कुठलाही एैवज गेला नव्हता.

या घटनेतील सीसीटीव्हीत चारचाकीसह चोरटे कैद झाले होते. या चोरट्यांनी खामगावातही चोरी केल्यानंतर तेथील पोलिसांनी घटनेतील एका संशयितांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

त्याला जळगावच्या रामानंदनगर पोलिसांनी 13 जुलै रोजी ताब्यात घेतले आहे. सज्जूसिंग कृष्णासिंग भादा वय 25 रा. जालना असे संशयिताचे नाव आहे. त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय घडली होती घटना

शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रीय महामार्गालगत रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमरास तवेरा कारमूधन आलेल्या चोरट्यांच्या टोळीने आकाशवाणी चौकातील अपेक्स मेडीकल, विनोद हॉस्पिटलचे मेडीकल व विवेकानंद नेत्रालय लक्ष्य केले.

यात अपेक्स मेडीकलमधून कामगाराची घड्याळ व 7 हजार 200 रुपये रोख लांबविले आहे. तर विेवेकानंद नेत्रालयातून दोन पाण्याच्या बाटल्या लांबविल्या आहेत. विनोद मेडीकल येथे चोरट्यांनी प्रवेश केला, मात्र रात्रपाळीच्या कामगाराला जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला व चोरट्यांनी रिकामे हाते परतण्याची वेळ आली.

दरम्यान एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत तीन ते चार चोरटे तवेरा कारसह येवून चोरी करतांना कैद झाले आहे. याप्रकरणी अपेक्स हॉस्पिटल येथील कामगार चेतन नेवे याच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खामगाव शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगावात पांढर्‍या कारने आलेल्या चोरट्यांनी तीच कार वापरून खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करुन तीन लाखांचा मुद्देमाल लांबविला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खामगाव शहर पोलिसांनी टोळीतील सज्जूसिंग कृष्णासिंग भादा यास जालन्याहून अटक केली होती.

दुसरीकडे रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासअधिकारी पोलीस नाईक सुशील चौधरी, विजय खैरे, उमेश पवार यांनी संशयित निष्पन्न केले होते. त्यात जालना येथील सज्जूसिंग याचे नाव समोर आले होते. मात्र जळगाव पोलीस त्यास अटक करतील, तोच खामगाव शहर पोलिसांनी सज्जूसिंगच्या मुसक्या आवळल्या होत्या.

खामगाव पोलिसांनी सज्जूसिंग यास ताब्यात घेवून सुशील चौधरी, विजय खैरे, उमेश पवार यांचे पथक 13 जुलै रोजी जळगावात परतले. न्यायालयात हजर केले असता, त्यास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एमआयडीसीतून चोरलेली गाडीही हस्तगत

मेडीकल फोडल्याच्या घटनेच्या दिवशी जळगाव शहरातील एमआयडीसी येथून चोरट्यांनी त्यांच्या जवळील दुचाकी सोडून देत, स्कॉर्पिओ गाडी लांबविली होती. या घटनेतही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते.

ही पांढरी कार वापरुन चोरट्यांनी जळगाव शहरातील मेडीकल फोडून पोबारा केला होता. तर खामगाव येथील गुन्ह्यातही हीच कार वापरुन चोरी केली होती. खामगाव शहर पोलिसांनी संबंधित स्कॉर्पिओ कारही हस्तगत केली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या घटनेतील संशयित सज्जूसिंग याचे इतर साथीदार फरार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com