अडीच लाखांच्या रोकडसह दीड टन वजनाची तिजोरीही घेवून पोबारा

जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील धाडसी चोरीने पोलीस प्रशासनासमोर आव्हान
अडीच लाखांच्या रोकडसह दीड टन वजनाची तिजोरीही घेवून पोबारा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कारमधून आलेल्या पाच चोरट्यांनी विसनजी नगरातील जिल्हा मार्केटींग फेडरेशन (जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादीत) या संस्थेत झोपलेल्या वाहनचालकाला टॅमीच्या सहाय्याने जीवे मारण्याची धमकी देत अडीच लाखाची रोकड ठेवलेली तब्बल दीड टनाची लोखंडी तिजोरी लांबविण्याची घटना मंगळवारी पहाटे पहाटे पावणे चार वाजता घडली.

मंगळवारी पहाटे 3.45 वाजेच्या दरम्यान चोरटे कारने कार्यालयाजवळ येत दरजावातून आत रेकी करतांना
मंगळवारी पहाटे 3.45 वाजेच्या दरम्यान चोरटे कारने कार्यालयाजवळ येत दरजावातून आत रेकी करतांना

फेडरेशनच्या कार्यालयात तब्बल अर्धातास धुमाकूळ घालणारे पाचही चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. चोरट्यांनी जागेवरच तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रयत्न असफल ठरल्याने चोरट्यांनी तिजोरीच घेवून पोबारा केला. शहराच्या मध्यवर्ती व भरवस्तीतील या धाडसी चोरीने शहरात खळबळ उडाली आहे.

कार्यालयात प्रवेश केलेला स्पष्ट दिसत असलेला चोरटा
कार्यालयात प्रवेश केलेला स्पष्ट दिसत असलेला चोरटा

जागेवरच गप्प पडून राहा नाहीतर...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विसनजी नगरात 1956 सालापासून जिल्हा मार्केटींग फेडरेशन (जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादीत) संस्थेचे कार्यालय असून या संस्थेमार्फत विकास दूधाचे शहरात वितरण केले जाते. रोज सकाळी साडे तीन वाजेपर्यंत संपूर्ण केंद्रावर दूध पोहचिले जाते. त्यानंतर चालक हा संस्थेच्या कार्यालयात येऊन झोपतो.

नेहमीप्रमाणे दुधाचे वितरण केल्यानंतर घनश्याम पंडीत सोनार (वय 38,रा.तुळजाई नगर) व त्यांचा भाचा पियुष सोनार असे दोघं जण 3.14 वाजता संस्थेत वेगवेगळ्या खोलीत झोपले असताना बाहेर दरवाजाला लावलेले कुलूप कोयंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला.

बाहेर कोणी तरी दरवाजा ठोकल्याचा आवाज आला असता सोनार हे बाहेर बघण्यासाठी जात असतानाच चार जण आतमध्ये आले व त्यातील एकाने गळ्यावर लोखंडी टॅमी ठेवली जागेवरच पडून राहा, नाही तर तुझा इथेच गेम करतो म्हणून दम दिला. त्यामुळे सोनार हे जागेवर तसेच पडून राहिले.

तिजोरी फोडण्याच्या प्रयत्न करण्याच्या लगबगीतील दोघे
तिजोरी फोडण्याच्या प्रयत्न करण्याच्या लगबगीतील दोघे

जागेवर तिजोरी तोडण्याचा प्रयत्न

एक जण तेथेच थांबून राहिला तर इतर तीन जण पुढे गेले. त्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आले. इतर कपाटांची त्यांनी तपासणी केली. दरम्यान, नंतर चौघांनी मिळून दीड टन वजनाची तिजोरी ढकलत बाहेर आणली. जातांना त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा, दोन इंटरनेटचे राऊटर व एक युनीट मशीन असा एकूण 2 लाख 66 हजार 500 रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेनंतर सोनार यांनी वॉचमन पाटील यांना घटनेची माहिती दिली.

त्यानंतर डेपो प्रमुख मयुर पाटील व सहायक व्यवस्थापक भगवान पाटील यांना घटना कळविली. याप्रकरणी घनशाम सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर संचालक वाल्मिक पाटील मॅनेजर विश्वनाथ पाटील, जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनीही घटनास्थळाला भेट पाहणी केली. तसेच माहिती जाणून घेतली.

दूध संघाचे वाहन ढकलत दरवाजासमोर आणले

जिल्हा मार्केटींग फेडरेेशनच्या कार्यालयासमोर राजेश टेन्स हाऊस या ठिकाणी एका दुकानावर वॉचनम असतो. कारमधून आलेल्या पाचही चोरट्यांपैकी सुरुवातीला एक जण आला. त्याने पाहणी केली असतावॉचमन दिसला. वॉचनमला प्रकार कळू नये म्हणून चोरट्यांनी दूध वितरण करुन आलेले 407 हे वाहन ढकलत ढकलत दरवाजासमोर उभे केले. यानंतर चारही चोरटे आतमध्ये शिरले. एक चोरटा कारमध्येच थांबून होता. चारही जण आतमध्ये शिरल्यावर तयपैकी एकाने वाहनचालकाच्या गळ्यावर टॅमी लावली तर इतर तिघांनी तिजोरी उचलून आणली.

डोक्यावर टोप्या अन् तोंडावर रुमाल

ज्या कारने चोरटे आले त्याचा कारचा क्रमांकी स्पष्ट दिसून येत असून ती कारसुध्दा चोरीचीच असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सर्व चोरट्यांनी टोपी तसेच तोंडाला रुमाल बांधलेला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे सर्व चोरट्यांच्या पायातील बुट हे सुध्दा अत्यंत महागडे ते सराईत गुन्हेगार असल्याचाही अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यासह स्थानिक गुन्हे शाखा तसेच श्वान पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनीही घटनास्थळाला भेट देत माहिती जाणून घेतली. दरम्यान चोरट्यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलीस कामाला लागले आहेत.

अर्धातासात खेळ खल्लास

पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी चोरटे विसजनी नगरात आले. याठिकाणी होमगार्डच्या कार्यालयासमोर कार उभी केली. 3 वाजून 46 पहिला मिनिटांनी सुरुवातीला एका चोरटा कार्यालयाकडे आला. त्याने गाडीतील इतरांना इशारा केला. यानंतर इतर तीन जण आले. समोरच्या वॉचनमला कळू नये म्हणून 3.50 मिनिटांनी दूध वितरण करणारे 407 वाहन ढकलत दरवाजा समोर उभे केले. 3.58 फेडरेशनच्या दरवाजाचे बाहेरचे कुलूप कडी कोयंडा तोडून चोरटे आतमध्ये शिरले. त्यानंतर तिजोरी घेवून 4 वाजून 10 मिनिटांनी बाहेर आले. 4.15 मिनिटांनी तिजोरी कारमध्ये टाकून चोरटे पसार झाले. अर्धातास चोरटे आतमध्ये होते. तर एका चोरटा शेवटपर्यंत कारमध्येच होता.

एकाच्या खांद्यावर उभे राहून दुसर्‍याने तोडले सीसीटीव्ही

चोरीपूर्वी तसेच चोरी केल्यानंतर चोरट्यांनी संपूर्ण खबरदारी घेतली. जिल्हा मार्केटींगच्या फेडरेशनच्या कार्यालयाच्या समोरच्या बाजूने दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते. हात पुरत नसल्याने एक चोरटा दुसर्‍या चोरट्याच्या खांद्यावर चढला व त्याने एक सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. तर तिजोरी बाहेर घेवून जाण्यापूर्वी चोरट्याने दुसर्‍या बाजूच्या सीसीटीव्ह कॅमेर्‍यामध्ये कैद होवू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा दुसर्‍या दिशेने वाकविला. आतमध्ये तिजोरी घेतल्यावर डीव्हीआर बॉक्स समजून चोरट्यांनी दोन इंटरनेटचे राऊटर व युनीट मशीन उचलून नेले. मात्र डीव्हीआर बॉक्स हा दुसर्‍या खोलीत असल्याने तो सुरक्षित राहिला. त्यामुळे चोरट्यांचा सर्व प्रताप सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला.

गस्तीवरील पोलिसांना चुकविले अन् दाखविला कार्यक्रम

पोलिसांनी घटनेनंतर ज्या मार्गाने चोरटे आले, त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत. यात जिल्हा रुग्णालयासमोर जिल्हापेठ पोलिसांचे गस्तीवरील पोलिसांचे वाहन जात होते. या वाहनाला संबंधित चोरट्यांची कार दिसून आले. मात्र गस्ती वाहनाला चुकवून चोरटे विसनजी नगरापर्यंत पोहचले. जर गस्तीवरील जिल्हापेठ पोलिसांनी संबंधित कारची चौकशी करुन पाठलाग केला असता, तर कदाचित घटना टळली असती, अशी माहिती समोर येत आहे. गस्तीवरील पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे घटना घडल्याचेही बोलले जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com