बेंंडाळे चौक परिसरातील सट्टा पेढीवर सशस्त्र दरोडा

तलवार, बंदुकीच्या धाकावर चार लाखांची रोकड लुटली ?
बेंंडाळे चौक परिसरातील सट्टा पेढीवर सशस्त्र दरोडा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील बेंडाळे चौक परिसरातील सट्टा पेढीवर सहा ते सात जणांनी सशस्त्र दरोडा टाकून तीन ते चार लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली असून शनिपेठ पोलीस निरिक्षकांसह कर्मचार्‍यांनी कमालीची चुप्पी साधली असल्याचे दिसून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन कर्मचार्‍यांसह शनिपेठ पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून चौकशी केली असून दरम्यान नेमका लुटल्याचा प्रकार खरा की खोटा हे समोर आलेले नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील बेंडाळे चौक परिसरात सट्टा पेढी आहे. या सट्ट्याच्या पेढीवर तलवार, बंदुकीसह चॉपर असे शस्त्र घेवून सहा ते सात जण आले. संबंधितांनी सट्टा पेढीवर असलेल्या कामगारांना शस्त्राचा धाक दाखवून, रोकड काढून देण्याचे सांगितले.

अशापध्दतीने जीवे मारण्याची धमकी देत दरोडेखोरांनी सट्टापेढीवरुन तीन ते चार लाखांची लुटून नेली. घटनेची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस स्टेशनचे दोन व स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन अशा चार कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून भेट दिली. तसेच याठिकाणी कामगारांची चौकशी केली. दरम्यान दरोड्याच्या घटनेची पोलीस कर्मचार्‍यांमध्ये एकच चर्चा आहे.

सट्टा पेढी कोणाच्या आशिवार्दाने सुरु ?

दरम्यान दरोड्याची घटना खरी की खोटी हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र जर प्रकार घडला असेल तर बेंडाळे परिसरातील सट्टा पेढी सुरु असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. एकीकडे पोलीस अधीक्षकांचे पथक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अवैधधंद्यावर कारवाई करत आहेत. तर दुसरीकडे मात्र जळगाव शहरात बेंडाळे चौक परिसरात सुरु सट्टापेढी नेमकी कोणाच्या आशिवार्दाने सुरु आहे ? असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com