‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून 96 हजारात फसवणूक

घर भाड्याने घेण्याच्या आमिषाने टेलीफोन नगरातील तरुणाला गंडा
‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून 96 हजारात फसवणूक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

लष्कराला नोकरीला असून तुमचे घर भाड्याने घ्यायचे आहे, असे सांगून एकाने वेगवेगळ्या नंबरचा वापर करुन मयुर देवेंद्र चौधरी (वय 26,रा.टेलीफोन नगर, जळगाव) या तरुणाची 95 हजार 996 रुपयांचा ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आज गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर चौधरी हा तरुण पुण्यात खासगी नोकरीला आहे. लॉकडाऊनमुळे सध्या जळगावातील घरुनच ऑनलाईन कामकाज सुरु आहे. अमरावती शहरात त्याचे स्वत:चे घर असल्याने मॅजिकब्रिक्स या वेबसाईटवर ऑनलाईन जाहिरात दिली होती.

त्यावरुन 5 जून रोजी रणदीप सिंग नाव सांगून एका व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधला व मी आर्मीत जम्मू काश्मिरला नोकरीला असून अमरावती युनीटला बदली झालेली आहे. त्यामुळे मला तुमचे घर भाड्याने घ्यायचे आहे असे सांगितले.

त्यानुसार चौधरी याने आधार कार्ड, पॅन कार्ड व क ँटीन कार्ड व्हॉटस्पवर पाठवा म्हणून सांगितले असता समोरील व्यक्तीने ते पाठविलेही. त्यानंतर संबंधित व्यक्तीने चौधरीकडे पेटीएम क्रमांक मागितला असता त्यानेही तो दिला.

क्यूआर कोड पाठविला अन् काही मिनिटात पैसे गायब

मयुर चौधरी याला 11 जून रोजी रात्री 8 वाजता संबंधित व्यक्तीचा फोन आला व 1 रुपयाचा क्युआर कोड पाठवितो व तो तुम्ही पेटीएमवर स्कॅन करा त्यानंतर माझा एक रुपया व तुमचा एक रुपया परत येईल असे असे तो म्हणाला.

त्यानुसार दोन रुपये मयुरच्या खात्यावर आले. त्यानंतर संबंधिताने मयुरला परत क्युआर कोड पाठविला. या क्यूआरकोडच्या सहाय्याने मयुरच्या पेटीएमवरुन 15 हजार 999 रुपये असे तीन वेळा एकूण 47 हजार 997 रुपये मयुरच्या पेटीएमवरुन पाठविले.

त्यानंतर मयुर याने घरी जाऊन परत 18 हजार रुपये पाठविले. अशा पध्दतीने एकूण 95 हजार 996 रुपये मयुरच्याच पेटीएमवरुन संबंधित व्यक्तीला पाठविण्यात आल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर क्राईम या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविली. या तक्रारीवरुन आज गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com