तब्बल पाऊणे दोन कोटी रुपयांत केळी उत्पादक शेतकर्‍याची ऑनलाईन फसवणूक

दिल्ली येथून संशयिताच्या सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या : पैसे डबल करण्याचे दाखविले होते आमिष
तब्बल पाऊणे दोन कोटी रुपयांत केळी उत्पादक शेतकर्‍याची ऑनलाईन फसवणूक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

एसबीआय लाईफ इन्श्युरन्स पॉलीसीला एजंट कोड आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैसे डबल करुन देण्याच्या आमिषाने मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील वामन काशिराम महाजन या केळी उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 1 कोटी, 73 लाख 89 हजार 945 रुपयांत फसवणूक केल्याची घटना 2014 ते 2019 दरम्यान घडली होती.

याप्रकरणी 7 मार्च 2020 रोजी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुुन्हयात सायबर पोलिसांनी तब्बल तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून फसवणूक करणार्‍या विकास कपूर सुरिंदर कपूर यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

त्याला घेवून आज बुधवारी पोलीस जळगावात पोहचले. त्याला आज मुक्ताईनगर न्यायालयात हजर केले असता, 25 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डबलच्या रकमेच्या चेकचे फोटो पाठवून विश्वास जिंकला

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील वामन काशिराम महाजन हे केळी उत्पादक शेतकरी आहेत. 2014 मध्ये महाजन यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमांचा फोन आला. एसबीआयल लाईफ इन्श्युरन्स पॉलीसी एजंट कोड, व म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पैस डबल मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

यादम्यान महाजन यांना संबंधितांनी पंकज कुमार, हरबंसवाल, कविता, समीर मेहरा, शुक्ला, एस.पी.सिन्हा, रिया मेहता अशा वेगवेगळ्या नावांच्या व्यक्तींनी संपर्क साधला. वेळोवेळी संपर्क साधून फंड रिलिफ करण्यासाठी पैसे ऑनलाईन पैसे भरण्यासा सांगितले. अशाप्रकारे संबंधितांनी महाजन यांना तब्बल वेगवेगळ्या 35 बँकाच्या खात्यांमध्ये पैसे भरावयास सांगितले होते.

तसेच मिळणार असलेल्या रकमेचे धनादेश तयार असून त्याचे छायाचित्र पाठवून संशयितांनी महाजन यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानुसार महाजन यांनीही संबंधितांनी सांगितल्याप्रमाणे 35 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 2014 ते 2019 या काळात 1 कोटी 73 लाख 89 हजार 945 एवढी रक्कम आरटीजीएस, निफ्टद्वारे जमा केली.

मुलाच्या लक्षात आला फसवणुकीचा प्रकार

एवढ्या मोठ्या प्रमाणावर वडील नेमकी कुणाला रक्कम देत आहे, याबाबत महाजन यांच्या मुलाला शंका आली. त्याने याबाबत वडीलांना विचारण केली. यात अशाप्रकारे पैसे डबल मिळत नसतात, तसेच संबंधितांकडून आपल्या वडीलांची फसवणूक होत असल्याचा प्रकार लक्षात आला. बदनामी होईल म्हणून सुरुवातीला महाजन यांनी तक्रार देणे टाळले.

मात्र सायबर पोलिसांनी त्यांची समजूत घातली यानंतर वामन महाजन 7 मार्च 2020 रोजी दिलेल्या तक्रारीवरुन मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा तपासासाठी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा तांत्रिक असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी यांनी सायबर पोलीस स्टेशनला या गुन्ह्याच्या समांतर तपासाचे आदेश दिले होते.

फसवणूक करणारी दहा ते 12 जणांची टोळी

सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे, पोलीस उपनिरिक्षक अंगत नेमाने, पोलीस नाईक दिलीप चिंचोले, पोलीस कॉन्स्टेबल गौरव पाटील, दिपक सोनवणे, अरविंद वानखेडे यांचे पथक संशयिताच्या शोधार्थ कामाला लागले होते.

संशयित हा दिल्लीतील असल्याचे निष्पन्न झाल्यावर पथक दिल्लीकडे रवाना झाले. तब्बल तीन दिवस पथकाने दिवसरात्र एक करुन दिल्ली, गाझीयाबाद, नोयडा, पालम, व्हिलेज याठिकाणी संशयिताचा शोध घेतला.

14 जून रोजी दिल्लीतील पालम या गावातून पथकाने संशयित विकासकपूर, सुरिंदर कपूर यास सापळा रचून अटक केली. त्याला अटक केल्यावर पथक आज बुधवारी जळगावात परतले. संशयितास मुक्ताईनगर येथील न्यायालयात हजर केले असता, त्यास 25 जून पर्यंत 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान संशयित विकास कपूर याच्या राजस्थानमध्येही अशाचप्रकारे एका जणांची एक कोटी 35 लाख रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. कपूरसह फसवणूक करणार्‍यांची दहा ते 12 जणांची टोळी सक्रिय असून त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com