महामार्गावर कार थांबवून लुटणार्‍या तिघांना अटक

संशयितांकडून पिस्तूल चॉपर चाकू जप्त
महामार्गावर कार थांबवून लुटणार्‍या तिघांना अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील खोटे नगर परिसरात महामार्गावर असलेल्या भरदिवसा राधिका हॉटेलसमोर काल गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता कार थांबवून मुक्ताईनगर येथील एकाला लुटणार्‍या टोळीचा आज शुक्रवारी तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

याप्रकरणी तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासातच लुटणार्‍या रोहन उर्फ रॉनी मधूकर सपकाळे, अनिकेत मधूकर सपकाळे ( दोन्ही रा.दांडेकर नगर, पिंप्राळा) व सतिष रवींद्र चव्हाण (रा. ओमशांतीनगर) या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, चॉपर तसेच चाकू व लुटीतील रक्कम जप्त करण्यात आली आहे.

मुक्ताईनगर येथील रहिवासी आतीक बिलाल खान हे गुरूवारी दुपारी धुळ्याहून जळगावकडे येत होते. दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास खोटेनगर परिसरातील राधिका हॉटेलसमोरून जात असताना दोन दुचाकीवरील चौघांनी त्यांची कार रस्त्यात अडविली. नंतर चौघांनी त्यांना मारहाण करून सहाशे रूपये लुटून नेले. याबाबत खान यांनी मुक्ताईनगर येथे तक्रार दिली.

मात्र, घटना ही जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्यामुळे ती तक्रार शुक्रवारी तालुका पोलीस ठाण्यात वर्ग होवून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांबाबत गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आज शुक्रवारी रोहन उर्फ रॉनी मधूकर सपकाळे या ताब्यात घेतले. चौकशीत रोहनने इतर दोघांची माहिती दिल्यावर पोलिसांनी त्याचे साथीदार अनिकेत मधूकर सपकाळे व सतिष रवींद्र चव्हाण यांनाही अटक केली. पोलिसांनी संशयित रोहन जवळ आढळून आलेले गावठी पिस्तूल, चॉपर, चाकू व लुटीतील सहाशे रूपये हस्तगत केले आहे.

तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक कल्याण कासार, सतिष हाळनोर, वासूदेव मराठे, विजय दुसाने, ललित पाटील, प्रवीण हिवराळे, सुशील पाटील, अनिल मोरे, दीपक कोळी, दीपक राव आदींनी ही कारवाई केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com