दुचाकी चोरली अन् अवघ्या १२ तासात दुचाकीसह दोघांना अटक

जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांची कामगिरी : धरणगाव पोलिसात होता गुन्हा दाखल
दुचाकी चोरली अन् अवघ्या १२ तासात दुचाकीसह दोघांना अटक

जळगाव - Jalgaon :

जळगाव धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून रविवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घरासमोरुन दोघा चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याची घटना घडली.

याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दुचाकी चोरल्यानंतर अवघ्या १२ तासात दुचाकी चोरणार्‍या गोविंदा डिगंबर जाधव वय १८ व नितीन गजानन माळी वय १९ दोन्ही रा. पाळधी या दोघांना जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी दुचाकीसह अटक केली. दोघांना आज बुधवारी धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पाळधी येथे साई बाबा मंदिराच्या पाठीमागे सोनार गल्ली येथे समाधान ज्ञानेश्‍वर पाटील वय ३० हे वास्तव्यास आहेत. पाटील यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर त्यांची दुचाकी क्र. एम.एच.१९ सी.डी.३८२८ ही उभी केली होती. रात्री एक वाजेच्या सुमारास दोघा चोरट्यांनी ही दुचाकी लांबविली. दुचाकी चोरल्यानंतर दोघा चोरट्यांनी दुचाकीची नंबरप्लेट काढून फेकली व ही दुचाकी विकण्यासाठी दोघे मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील भास्कर मार्केट येथे आले.

दोन जण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी भास्कर मार्केटला आल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल शेखर जोशी व हेडकॉन्स्टेबल तुषार जावरे या दोघांना मिळाली.

पोलीस निरिक्षक विलास शेंड, पोलीस उपनिरिक्षक मनोज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शेखर जोशी, तुषार जावरे, प्रविण भोसले, रामेश्‍वर ताठे, भरत बारी, विनोद पाटील या कर्मचार्‍यांनी भास्कर मार्केटमधून दुचाकी विकण्यासाठी आलेल्या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले.

चौकशीत गोविंदा डिगंंबर जाधव व नितीन गजानन माळी रा. पाळधी अशी त्यांची नावे समोर आली. दोघांना खाकीचा हिसका दाखविल्यावर त्यांनी दुचाकी चोरीची कबूली दिली.

दुचाकीच्या चेसीस क्रमांकावर शेखर जोशी यांनी दुचाकी मालक निष्पन्न केला. पाळधी येथील समाधान ज्ञानेश्‍वर पाटील यांची ती दुचाकी असल्याची माहिती मिळाली. चौकशीत याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाल्यावर कर्मचार्‍यांनी धरणगाव पोलिसांशी संपर्क साधला.

त्यानुसार आज बुधवारी दोघांना धरणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान अर्लट पोलिसिंगमुळे अवघ्या १२ तासातच दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश होवून मालकाला त्याची चोरीस गेलेली दुचाकी सुखरुप मिळाली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com