फसवणूक झालेल्या व्यापार्‍यांना दहा लाखांचा मुद्देमाल मिळाला परत

तालुका पोलिसांची कामगिरी : संशयितांना सोबत घेत इंदोरमधून ट्रकभर माल हस्तगत
फसवणूक झालेल्या व्यापार्‍यांना दहा लाखांचा मुद्देमाल मिळाला परत
USER

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

गुन्हेगार हा कितीही शातीर, सराईत असला तरी , ते म्हणतात ना कानून के हाथ लंबे होते. पोलीस संशयितांपर्यंत पोहचून गुन्ह्याचा उलगडा करतातच. याच उक्तीला अनुसरुन तालुका पोलिसांनी कामगिरी केली आहे.

संशयितांना केवळ अटकच नाही तर फसवणूक झालेला भांडे, टाईल्स, कढईसह असा एकूण 10 लाखांचा मुद्देमाल व्यापार्‍यांना सही सलामत मिळवून दिला आहे. अटक केलेल्या तिघा संशयितांना घेवून इंदोरची वारी करत तालुका पोलिसांनी माल हस्तगत केला असून संशयित व मुद्देमालाचा ट्रक घेवून पथक आज जळगावात पोहचले.

जळगावातील खोटेनगर येथील अंबिका बिल्डर्स यांच्याकडून प्रदीप मखीजा, राहूल वाधवानी व हरिषकुमार पेशवानी या तिघांनी 642 टाईल्सचे बॉक्स खरेदी करुन त्यापोटी दुकानमालकाला 7 लाख 6 हजार 200 रुपयांचा जळगाव शहरातील युनीयन बँकेचा धनादेश दिला होता.

प्रदीप मखीजा यांच्या नावाचा धनादेश बॅकेट वटविण्यासाठी दिला असता, बँकेत रक्कम नसल्याने तो वटला नाही. फसवणुकीची खात्री झाल्यावर अंबिका बिल्डर्सचे संचालक प्रशांत शांतीलाल पटेल रा. गणपतीनगर यांनी तालुका पोलीसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशाच प्रकारे अमर किचन वेअरचे संचालक जगदीश दादूमल मंधान रा.गणपतीनगर यांच्याकडून 1 लाख 45 हजार रुपये किंमतीचे कुकर,स्टील खरेदी तसेच ईच्छादेवी चौकातील गोदावरी प्लायवूडचे परेश जगदीश तलरेजा रा.सिंधी कॉलनी यांच्याकडून 89 हजार 680 रुपये किंमतीचे प्लायवूड खरेदी करुन संशयितांनी फसवणूक केली होती.

इंदोरमध्ये पाठविला होता ट्रक भरुंन माल

पोलिसांनी 9 मे रोजी शहरातून सापळा रचून संशयित प्रदीप माखीजा राहूल वाधवानी, हरिषकुमार पेशवानी या तिघांना अटक केली होती. या तिघांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यावर चौकशीत संशयितांकडून व्यापार्‍यांची फसवणूक करुन घेतलेला माल हा इंदोरला ट्रकव्दारे रवाना केला असल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि.रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.विश्वनाथ गायकवाड, हरीलाल पाटील,महेंद्र सोनवणे,अभिषेक पाटील यांचे पथक संशयितांना घेवून इंदोरला रवाना झाले होते.

दोन दिवसाच्या तपासात पथकाने जळगावातील व्यापार्‍याकडून घेतलेला 7 लाख 6 हजार 200 रुपयांचे 522 स्टाईलचे बॉक्स,2 लाख 84 हजारांचे 31 कढई व 243 कुकर तसेच 89 हजार 860 रुपये किंमतीचे 65 प्लायवूड असा एकूण 10 लाख 80 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मुद्देमालासह संशयितास घेवुन पोलिसांनी आज जळगाव गाठले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com