शैक्षणिक लोन देण्याच्या आमिषातून डॉक्टरला 62 हजारांत गंडविले

बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे भासवून फसवणूक
शैक्षणिक लोन देण्याच्या आमिषातून डॉक्टरला 62 हजारांत गंडविले

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील बीगबाजार रोड परिसरातील रहिवासी डॉक्टरची तो शिक्षण घेत असतांना बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगत सात लाख रुपयांचे एज्युकेशन लोन मिळवून देण्याच्या आमिषाने चौघांनी 62 हजार 497 रुपयांची फसवणूक केल्याची घटना 9 डिसेंबर 2020 ते 25 फेब्रुवारी 2021 दरम्यान घडली. या फसवणुकीप्रकरणी आज शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील बीगबाजार रोड परिसरात डॉ. अनुपम रमेश दंडगव्हाळ हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांनी बीएएमएसचे वैद्यकीय पदवी घेतली आहे. दरम्यान 2020 मध्ये या पदवीचे शिक्षण घेत असतांना, दंडगव्हाळ यांना मोबाईल फोन आला. त्यांनी बजाज फायनान्स मधून बोलत असल्याचे सांगत लोन मिळवून देण्याचे सांगितले.

यावेळी डॉ. अनुपम दंडगव्हाळ यांनी सात लाख रुपये लोन हवे असल्याचे संबंधितांना सांगितले. यानंतर बजाज कंपनीमधून स्वप्निल माणगावकर, आर्या पाटील, संस्कृती राजे या नावाने संबंधितांनी डॉ. दंडगव्हाळ यांना फोन केले.

तसेच लोन मिळवून देण्यासाठी आधारकार्ड तसे पॅनकार्ड ही कागदपत्रे व्हॉटसअ‍ॅपद्वारे मागवून संबंधितांनी दंडगव्हाळ यांचा विश्वास संपादन केला. तसेच लोन मिळवून देण्यासाठी प्रोसेसिंग लागेल म्हणून 4 हजार 999 रुपये, 10 हजार 500 रुपये, 9 हजार 999 रुपये, 10 हजार 999 रुपये अशा रक्कमा बॅकेच्या जमा करण्यास सांगितल्या.

डॉ. दंडगव्हाळ यांनी संबंधितांनी सांगितल्याप्रमाणे गुगल पे व्दारे पैसे पाठविले. सदरचे पैसे भरल्यावरही एज्युकेशन कीट घ्यावयाचे सांगून त्यासाठी 11 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. व लोनची 7 लाख रुपये जमा होतील असे सांगितले.

अशा पध्दतीने डॉ दंडगव्हाळ यांनी 9 डिसेंबर 2020 ते 25 फेब्रुवारी 2021 दरम्यान या काळात संबंधितांनी सांगितल्यानुसार वेळावेळी असे एकूण 62 हजार 497 रुपये भरले मात्र लोन मिळाले नाही.

18 मार्च रोजी संबंधितांचे फोन बंद झाले. अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्याने फसवणुकीची खात्री झाल्याने डॉ. दंडगव्हाळ यांनी तीन महिन्यानंतर आज शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीवरुन डॉ. दंडगव्हाळ यांना बजाज कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून फोन करणारे स्वप्निल माणगावकर, आर्या पाटील, संस्कृती राजे याच्यासह इतर अशा चार जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धनराज निकुंभ हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com