हळदीचा व्हिडीओ व्हायरल; नवदेवावर गुन्हा दाखल

शहर पोलिसांची कारवाई
हळदीचा व्हिडीओ व्हायरल; नवदेवावर गुन्हा दाखल

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

लग्नासोहळ्यात हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करणार्‍या नवदेवासह सुमारे 15 ते 20 वर्‍हाडींविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लग्नसमारंभांसाठी देखील मर्यादा आखून दिल्या आहेत. तसेच लग्नासाठी केवळ 25 जणांना परवानगी दिलेली आहे मात्र नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

शहरासह जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून शहरातील कानळदा रोडवरील धनाजी काळे नगरात गणेश महाजन या तरुणाचा विवाह होता.

19 मे रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास हळदीच्या कार्यक्रमात घरगुती साऊंड सिस्टीम लावून त्याने 15 ते 20 जणांचा जमाव जमवित नाचगाणे सुरु होते. या कार्यक्रमाचा व्हिडीओ नवरदेवाने सोशल मिडीयावर व्हायरल केला होता.

व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांची धाव

हळदीच्या कार्यक्रमातील नाचगाण्याचा व्हिडीओ व्हायरल होताच शहर पोलिस ठाण्याचे अक्रम शेख, भास्कर ठाकरे, रतनहरी गिते, प्रणेश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. नवदेवासह त्याच्यासोबत असलेल्यांना ताब्यात घेतले.

नवरदेवासह 15 ते 20 जणांवर गुन्हा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी संचारबंदी व जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. परंतु लग्न सोहळ्यात बेकायदेशीररित्या जमाव जमविणार्‍या नवदेवासह 15 ते 20 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com