तामिळनाडूत 50 लाखांची चोरी करणार्‍यास रेल्वेत अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; चोरट्यांकडून 38 लाख रुपये हस्तगत
तामिळनाडूत 50 लाखांची चोरी करणार्‍यास रेल्वेत अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कामाला असलेल्या नोकरांनी मालकाकडे 50 लाख रुपयांची चोरी केली. चोरलेली रक्कम घेवून ते राजस्थानमध्ये फरार होत असतांनाच त्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चोरलेली 38 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

तामिळनाडू राज्यातील सेलम जिल्ह्यातील सेवापेट तालुक्यातील देवनयागम येथील मोहनकुमार जगाथानी यांच्याकडे कामाला असलेल्या नोकरांनी त्यांच्या घरात जबरी चोरुन करुन 50 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना 19 मे रोजी घडली होती.

याप्रकरणी सेलम पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रक्कम चोरी केल्यानंतर गुन्ह्यातील दोन चोरटे हे राजस्थानमधील असल्याने ते आपल्या गावी जात असल्याची माहिती सेलमच्या पोलीस अधीक्षकांना मिळाली होती.

त्यानुसान त्यांनी तात्काळ राजस्थान जाणार्‍या मार्गावरील जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना याबाबतची माहिती दिली. पथकाने मलकापूर ते जळगाव दरम्यान चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसची तपासणी केली.

यात त्यांना संशयित आरोपी मंगलराम आसूराम बिस्नोई (वय 19) रा. खडाली ता. गुडामालाणी जि. वाडनोर राजस्थान याच्यासह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेल्या रकमेपैकी 37 लाख 97 हजार 780 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली.

या पथकाने केली कारवाई

पोलीस अधीक्षकांनी घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना देत गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार बकाले यांनी अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, सुनिल दामोदरे, विनोद पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, मुरलीधर बारी यांच्या पथकाने कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com