जन्माला मुलीच आल्या म्हणून पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप

जन्माला मुलीच आल्या म्हणून पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेप

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : पाचोरा शहरातील 2019 मधील घटना

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

तिन्ही मुलीच झाल्याच्या कारणावरुन कस्तुराबाई पप्पू पवार वय 30 या महिलेचा तिच्या पतीने खून केल्याची घटना 9 जून 2019 रोजी घडली होती.

या गुन्हयात आरोपी पती पप्पू रतन पवार यास न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. दरम्यान गुन्हा घडल्यानंतर अटक झाल्यापासून आरोपी पती पप्पु पवार हा कारागृहातच होता. आज तो व्हीडीओ कॉन्फरन्सने हजर होता. दरम्यान जन्मदात्या पित्याविरोधातच मुलीला साक्ष देण्याची दुर्देवी वेळ मुलीवर आली. खटल्यात घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेल्या मुलीचीच साक्ष महत्वपूर्ण ठरली.

लाकडी दांड्याने केला पत्नीचा खून

पाचोरा येथील विवेकानंद नगर तांडा येथे आरोपी पप्पु रतन पवार वय 31 हा त्याची मयत पत्नी कस्तुराबाई वय 30 व त्यांच्या तीन मुलींसह राहत होता. पाचोरा येथेच एक हॉटेलवर पप्पू कामाला होता. पप्पु पवार यास दारू पिण्याचे सुद्धा व्यसन होते. कस्तूराबाई यास तीनही मुलीच जन्माला आल्याने तसेच मुलगा होत नाही या कारणावरुन पती पप्पू हा तिला वेळावेळी मारहाण करत होता.

दि. 9 जून 2019 रोजी रात्री कस्तुराबाईला मुलीच होता या व दारूच्या कारणाने आरोपीने पत्नी कस्तुराबाईशी भांडण करून तिला शिवीगाळ केली व लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली. यात कस्तूरीबाई खाली पडली. यानंतर आरोपीच्या घराच्या शेजारी राहणारे त्याचे भाऊ व वहिनीने जखमी कस्तूराबाई हिला पाचोरा येथील रुग्णालयात दाखल केले होते. याठिकाणी तिला डॉक्टरांनी मयत घोषित केल होते. याप्रकरणी मयत कस्तूराबाई यांची आई पद्माबाई सखाराम राठोड वय 60 रा.आनंद नगर तांडा ता.एरंडोल यांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस स्टेशनला भा.द.वि.कलम 302,504 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हा घडल्यापासून आरोपी पती कारागृहातच

घटनेच्या दुसर्‍या दिवशीची पोलिसांनी आरोपी पप्पू पवार यास अटक केली होती. तपासधिकारी पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी तपास पूर्ण करुन या गुन्ह्याचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले होते.

खटल्यावर सर्वप्रथम तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए.सानप याच्या समोर कामकाज चालले. त्यांच्या समक्ष या खटल्याचे कामी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी आठ साक्षीदार तपासले, परंतु त्यांची बदली झाल्यामुळे व त्यानंतर कोरोनाच्या निर्बंधामुळे सदर खटला पुढे चालु शकला नव्हता त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांच्या समोर सरकार पक्षाने उर्वरित दोन साक्षीदार तपासून खटल्याचे काम पूर्ण केले.

आरोपी म्हणाला, मुलींच्या पालनपोषणासाठी शिक्षा नको !

शिक्षेबाबत न्यायालयाने आरोपी पप्पू पवार यास विचारणा केली असता, मुलींच्या पालनपोषणासाठी शिक्षा नको, असे सांगितले. त्यावर जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी मुलीच जन्माला आल्या. एकापाठोपाठ तीन मुली झाल्या त्यामुळे आरोपी पतीचा कस्तूराबाई हिच्यावर रोष होता. यातूनच त्याने कस्तूराबाईचा खून केला. व आता मुलीच्या पालनपोषणासाठी शिक्षा नको असे आरोपी सांगत आहेत. त्यात जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तीवाद केला. यानंतर न्यायाधीश यांनी आरेापीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सात वर्षांच्या मुलीची साक्ष ठरली महत्त्वपूर्ण

या खटल्यात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी एकूण 10 साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने आरोपीची सात वर्षांची मोठी मुलगी कु.गौरी हिची साक्ष महत्वपुर्ण ठरली. कारण ही सर्व घटना तिच्या समोर घडलेली असल्यामुळे तिने सर्व घटनाक्रम जसाचा तसा न्यायालयासमोर सांगीतला व घटना करणारा व्यक्ती कोण आहे असे विचारले असता तिने तिच्या वडिलांकडे म्हणजेच आरोपीकडे बोट दाखवले होते.

या व्यतिरिक्त फिर्यादी पद्माबाई राठोड, डॉ. निलेश देवराज, पंच साक्षीदार व पोलीस उपनिरिक्षक पंकज शिंदे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. आज मंगळवारी या खटल्याच्या निकालावर कामकाज झाले. यात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांनी कस्तुराबाई पवार हिचा खून केला म्हणून तिचा पती आरोपी पप्पु रतन पवार याला दोषी ठरवून जन्मठेपेची व 5,000 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

मुलींबाबतची ‘नकोशी’ प्रवृत्ती कधी संपणार ?

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल सुरु आहे. मात्र अद्यापही समाजामध्ये मुलींबाबतची नकोशी प्रवृत्ती संपलेली नसल्याचे चित्र आहे. शासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. मात्रही तरीही मुलगी नको मुलगाच हवा...ही समाजातील मानसिकता अजूनही कायम आहे. या मानसिकतेतून कस्तुराबाई हिचा खून झाल्याचे संबंधित खटल्याच्या निकालावर स्पष्ट होते. मुलगा आणि मुलगी एक समान आहे. हा कधी भेद कधी नष्ट हा प्रश्न उपस्थित होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com