26 ठिकाणी घरफोडी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास अटक

26 ठिकाणी घरफोडी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे तब्बल 26 गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार भूषण उर्फ जिगर रमेश बोंडारे (रा. उमाळा, ता.जळगाव) या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मंगळवारी औरंगाबाद येथून अटक केली.

औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भागात संशयित जिगर बोंडारे हा राहत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल जयंत चौधरी, प्रदीप पाटील, पोलीस नाईक विजय शामराव पाटील, पंकज शिंदे, अविनाश देवरे, दिपक शिंदे यांच्या पथकाने संशयित जिगर यास आज मंगळवारी औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा भागात सापळा रचून अटक केली.

संशयित जिगर बोंडारे याने सहा महिन्यापूर्वी उमाळा येथील अजय सुदाम भील, औरंगाबाद येथील प्रथमेश पाटील, पवन विश्वनाथ अग्रवाल व मनोज भांबळे अशांना सोबत घेऊन एका कार चालकास लिफ्ट मागितली होती आणि उमाळ्याजवळ त्याच्या डोक्याला गावठी पिस्तूल रोखून व डोळ्यात मिरची पूड टाकून रोख रक्कम व मोबाईल हिसकावून पळ काढला होता. त्याच काळात जिगर याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com