शासकीय कामात अडथळा ; विक्रेत्याविरोधात गुन्हा

बजरंग बोगदा परिसरात मनपा पथकासह पोलिसांवर दगडफेकीचा प्रयत्न
शासकीय कामात अडथळा ; विक्रेत्याविरोधात गुन्हा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील बजरंग बोगदा परिसरात रेल्वे रुळालगत भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव केल्यामुळे संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी गोंधळ घालत महापालिकेच्या पथकासह पोलिसांवर दगडफेकीचा प्रयत्न केला.

तसेच काही विके्रत्यांनी महापालिकेच्या ट्रॅक्टरसमोर येवून कारवाईला विरोध केला. त्यामुळे शासकीय कामात आणणार्‍या विक्रेत्यांविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमिवर भाजीपाला विक्रेत्यांना केवळ सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली आहे.

परंतु बजरंग बोगदा परिसरात, विक्रेत्यांनी आपली भाजीपाला विक्रीची दुकाने सुरुच ठेवली. त्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निमुर्लनाचे पथक त्याठिकाणी कारवाई करण्यासाठी पोहचले.

यावेळी कारवाईला विरोध करत विक्रेत्यांनी गोंधळ घालत दगडफेकीचा प्रयत्न केला. त्यामुळे उपायुक्त संतोष वाहुळ यांनी तात्काळ पोहचून विक्रेत्यांची समजूत घातली.

तसेच याठिकाणी न बसता मानराज पार्कजवळ दिलेल्या पर्यायी जागेवर व्यवसाय करण्याची सूचना केली. तरीदेखील गोंधळ सुरुच होता.

त्यामुळे जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विलास शेंडेंसह पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

त्यानंतरही विक्रेत्यांनी पोलिसांशीही वाद घातला. या प्रकाराची माहिती मिळाल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह क्यूआरटी पथकाने घटनास्थळ गाठून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जमावाला पांगविले.

ट्रॅक्टर रोखण्याचा प्रयत्न

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने विके्रत्यांवर कारवाई करत त्यांचा माल जप्त केला. ट्रॅक्टरमधून जप्त केलेला माल आणत असतांना काही विक्रेत्यांनी ट्रॅक्टर रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच काही विक्रेत्यांनी ट्रॅक्टरवर चढून गोंधळ घातला. याप्रकरणी महापालिकेचे कर्मचारी भानूदास अंबर ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन श्याम आनंदचंद भोई रा. खंडेराव नगर, आकाश शिवाजी गावंडे, सागर शिवाजी गावंडे दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी या तिघांसह 15 जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सात दुकानांवर सीलची कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र निर्बंधातही लपून छपून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह संजय ठाकूर, सुनील पवार, नाना कोळी, नितीन भालेराव , किशोर सोनवणे, राहूल कापूरे, सलमान भिस्ती यांच्या पथकाने इस्लामपुरा, बळीरामपेठे, पोलनपेठ, राजकमल टॉकीज परिसरात पाहणी केली. यादरम्यान सात दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. यात ईस्लामपुरा येथील हाजी मस्तान टॉईज, बळीरामपेठेतील, श्री बालाजी सन्स, बजाज ट्रेडर्स, पोलनपेठेतील भोईराज फरसाण भांडार, सुनील शिंपी, तर राजकमल टॉकीज परिसरात रोडवरील गजानन इलेक्ट्रीकल लोढा, इंडस्ट्रीज या दुकानांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com