एक जण जिल्ह्यातून चोरायचा अन् नांदुर्‍यातील दोघे विकायचे चोरीच्या दुचाकी

पोलिसांकडून तिघांना घेतले ताब्यात : जिल्ह्यातून चोरलेल्या 9 दुचाकी दिल्या काढून
एक जण जिल्ह्यातून चोरायचा अन् नांदुर्‍यातील दोघे विकायचे चोरीच्या दुचाकी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश केला असून तीन संशयितांना अटक केली होती. यात जळगाव शहरातून रोहित पंडीत निंदाने वय-21 रा. शनिपेठ यालाही अटक करण्यात आली होती.

रोहित हा जळगाव शहरातून दुचाकी चोरुन त्याचे नांदुरा येथील साथीदारांपर्यंत पोहचवायचा. यानंतर ते दोघेही दुचाकीची विक्री करायचे.

रोहित सैंदाणेसह सैय्यद रोशन सैय्यद कादीर (35) आणि सैय्यद आझाद उर्फ बब्बू सैय्यद कादीर (43) दोघे रा.नांदुरा-बुलढाणा या तिघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिघांनी शहरातून चोरलेल्या 9 गाड्या काढून दिल्या आहेत.

तिघांनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांच्याकडून चोरीच्या एकुण 17 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. एकुण 5 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला होता.

दरम्यान तिघांना जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.

तिघांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतून 1, शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून 3, शहर पोलीस स्टेशन 3, नशिराबाद 1 आणि भुसावळ पोलीस स्टेशनला 1 याप्रमाणे नऊ दुचाकी चोरल्या होत्या.

शहर पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्याच्या चौकशी कामी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अक्रम शेख, रतन गिते, भास्कर ठाकरे, प्रणेश ठाकूर यांनी अकोला पोलिसांकडून तिघांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान शनिपेठेतील रोहित हा जळगाव शहरातून गाड्या चोरुन त्यांचे नांदुरा येथील साथीदारांकडे पोहचवित होता.

याठिकाणी गाड्या पोहचल्यावर सैय्यद कादीव सैय्यद आझाद कादीर हे दुचाकी विक्री करायचे. दुचाकी विक्री केल्यानंतर मिळालेले पैसे तिघेही वाटून घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com